भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेच्या सौरनियंत्रित विंड्रो कंपोस्टिंग प्रकल्पाला राष्ट्रीय स्तरावरील ‘स्कॉच रौप्य पुरस्कार’ मिळाला. मात्र, या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध करून देण्यासह पाठपुरावा केल्याचा दावा करणाऱ्या मंत्री प्रताप सरनाईक यांच्या योगदानाचा पुरस्कार स्वीकारताना उल्लेख न झाल्याने त्यांनी महापालिका प्रशासनावर उघड नाराजी व्यक्त केली आहे.

नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे झालेल्या कार्यक्रमात महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील आणि उपायुक्त सचिन बांगर यांनी पुरस्कार स्वीकारला. मिरा रोड पूर्व येथील हटकेश आणि भाईंदर पूर्व येथील सचिन तेंडुलकर मैदान येथे दररोज २० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता असलेले हे प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

कचरा आणि खत व्यवस्थापनासाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून १०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करून आणण्यासाठी आपण प्रयत्न केल्याचा दावा सरनाईक यांनी केला आहे. या निधीतून उभारलेल्या प्रकल्पाला पुरस्कार मिळाल्यानंतर प्रशासनाकडून आपल्या योगदानाचा उल्लेख न झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.

दरम्यान, पेणकरपाडा येथेही दररोज २० टन ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी प्रकल्प सुरू करण्यात आला होता. मात्र, पायाभूत काम झाल्यानंतर त्याचा कार्यादेश रद्द करण्यात आला. या कामासाठी दोन कोटी रुपयांहून अधिक खर्च झाल्याचा दावा सरनाईक यांनी केला असून, हा प्रकल्प पूर्ण झाला असता तर शहरातील कचरा व्यवस्थापनावरील ताण आणखी कमी झाला असता, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.