भाईंदर: मिरा भाईंदर शहरात पर्यावरण संवर्धनासाठी तसेच स्वच्छतेसाठी विविध उपाययोजना आखल्या जात असताना, दुसरीकडे मात्र कांदळवनाच्या भागात, समुद्रकिनारी, रस्त्यांवर शहरातील नागरिक सर्रास कचरा टाकत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
स्वच्छता सर्वेक्षण २०२४ मध्ये देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ३ ते १० लोकसंख्या असणाऱ्या शहराच्या गटात मिरा भाईंदर शहराने स्वच्छ शहराचा पुरस्कार पटकावला होता. त्यामुळे शहरातील नागरिक, प्रशासन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे अधोरेखित झाले होते. मात्र आता मिरा भाईंदर शहराच्या स्वच्छ शहर या प्रतिमेला खोटं ठरवणारी एक चित्रफित सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागली आहे.
या चित्रफितीत शहरातील सांडपाणी वाहून नेण्यासाठी असणाऱ्या नाल्यात लोकांनी मोठ्या प्रमाणावर कचऱ्याने भरलेल्या गोण्या टाकल्याचे दिसून येत आहे. पण, यात आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे एक साप त्या गोण्या ओढत नाल्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत दिसत आहे.
व्हायरल होणारी ही चित्रफित मिरा-भाईंदर आणि दहिसर परिसरातील पेणकरपाडा नाल्याजवळची आहे. कांदळवन संरक्षण स्थळपाहणी दरम्यान ती टिपण्यात आली. या चित्रफितीत साप चक्क त्याच्या वजनापेक्षा सुमारे १० पटीने जड असणाऱ्या गोणीला खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे, पर्यावरणप्रेमी हर्षद ढगे यांनी सांगितले.
व्हायरल होणारी ही चित्रफित मिरा-भाईंदर आणि दहिसर परिसरातील पेणकरपाडा नाल्याजवळची आहे. कांदळवन संरक्षण स्थळपाहणी दरम्यान ती टिपण्यात आली. या चित्रफितीत साप चक्क त्याच्या वजनापेक्षा सुमारे १० पटीने जड असणाऱ्या गोणीला खेचण्याचा प्रयत्न करत असल्याचे, पर्यावरणप्रेमी हर्षद ढगे यांनी… pic.twitter.com/jMlRRUnyHH
— LoksattaLive (@LoksattaLive) November 2, 2025
तसेच पुढे ते म्हणाले की, हे दृश्य फक्त एक साधे कृतीचित्र नसून, निसर्गातील प्रत्येक जीवाची स्वच्छतेबद्दलची नैसर्गिक प्रवृत्ती दर्शवते. या चित्रफितीतून एक स्पष्ट संदेश मिळतो – माणसं जिथे कचरा फेकतात, तिथे निसर्गातील जीव त्या जागेची स्वच्छता करण्याचा प्रयत्न करतात. निसर्ग आपले काम करत आहे; आता आपली जबाबदारी आहे की आपणही या स्वच्छतेच्या प्रयत्नात सक्रियपणे सहभागी व्हावे.
महापालिकेत सापांची भरती?
व्हायरल होणाऱ्या या चित्रफितीवर नेटकऱ्यांनीही विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी नदी नाल्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर काहींनी महापालिकेच्या दुर्लक्षावर बोट ठेवत, सफाई कर्मचाऱ्यांची भरती सुरू आहे. सर्व सापांनी त्वरित आपले अर्ज आयुक्तांकडे द्यावेत. तात्काळ नोकरी देण्यात येईल. पण, पगाराची अपेक्षा ठेवू नका, असा मिश्कील टोला लगावला आहे.
