भाईंदर :-मिरा भाईंदर महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतीपदी भाजपचे गटनेते हसमुख गेहलोत यांची १३ विरुद्ध ३ मतांनी निवड करण्यात आली. कोकण विभागीय आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी नियुक्त केलेल्या पिठासीन अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
महापालिकेच्या निवडणुका पूर्ण झाल्यानंतर सत्तास्थापना झाली असून महापौर डिंपल मेहता यांनी पदभार स्वीकारल्यानंतर स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती निवडीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

त्यानुसार शुक्रवारी झालेल्या बैठकीत मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांनी पिठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले.स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपकडून हसमुख गेहलोत यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता, तर काँग्रेस व शिवसेनेच्या संयुक्त ‘मिरा भाईंदर विकास आघाडी’ कडून अनिल सावंत यांनी उमेदवारी दिली होती. मतदानानंतर १६ सदस्यीय स्थायी समितीत भाजपच्या १३ सदस्यांच्या संख्याबळावर गेहलोत यांचा विजय झाला.तर आघाडीचे ३ मते अनिल सावंत यांच्या बाजूने पडली.

महिला बालकल्याण पदी अनिता पाटील

मिरा भाईंदर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापतीपदासाठी विरोधकांकडून अर्ज दाखल न झाल्याने अनिता पाटील यांची सभापती आणि हेमा बेलानी यांची उपसभापती पदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे.नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे महापालिकेच्या प्रशासकीय कामकाजाला गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.