भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकाच्या स्थायी समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांच्या निवडीसाठी ४ मार्च रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेत मतदान प्रक्रियेद्वारे पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे.महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जानेवारी महिन्यात पार पडल्या.
९५ पैकी ७८ जागांवर विजय मिळवत तसेच एका अपक्ष नगरसेवकाचा पाठिंबा मिळवून भाजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. विरोधकांमध्ये काँग्रेसचे १३ आणि शिवसेनेचे ३ नगरसेवक एकत्र येत ‘मिरा-भाईंदर विकास आघाडी’ची स्थापना करण्यात आली आहे. २० फेब्रुवारी रोजी नवनिर्वाचित महापौर डिंपल मेहता यांनी महासभा बोलावून प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात केली.
या महासभेत स्थायी समिती, महिला व बालकल्याण समिती तसेच परिवहन समिती गठीत करण्यात आल्या. त्यानुसार स्थायी समिती आणि महिला व बालकल्याण समितीच्या सभापती व उपसभापती पदांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. स्थायी समितीमध्ये एकूण १६ सदस्य असून त्यापैकी १३ सदस्य भाजपचे तर ३ सदस्य मिरा-भाईंदर विकास आघाडीचे आहेत. महिला व बालकल्याण समितीत एकूण ९ सदस्यांपैकी ७ सदस्य भाजपचे आणि २ सदस्य आघाडीचे आहेत.
भाजपचा दबदबा:-
निवड प्रक्रियेसाठी कोकण विभागीय आयुक्तालय यांच्याकडून विशेष सभेचे आदेश देण्यात आले आहेत. या सभेसाठी पीठासीन अधिकारी म्हणून सौरभ कटियार (जिल्हाधिकारी, मुंबई उपनगर) यांची नियुक्ती करण्यात आली असून, त्याबाबतचे आदेश विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी जारी केले आहेत.महापालिकेत तसेच संबंधित समित्यांमध्ये भाजपचे बहुमत असल्याने सभापतीपदे भाजपकडे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

