भाईंदर: भाईंदर पूर्व भागात महापालिका प्रशासनाकडून विचित्र पद्धतीने शौचालय उभारण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. मिरा-भाईंदर शहरात नागरिकांच्या सोयीसाठी महापालिका प्रशासनाकडून विविध ठिकाणी सार्वजनिक शौचालयांची उभारणी करण्यात आली आहे. या शौचालयांच्या उभारणीसह देखभाल-दुरुस्तीसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. मात्र, शौचालयांच्या दुरवस्थेचे चित्र वारंवार समोर येत असते. दरम्यान, आता शौचालयांच्या उभारणीतही प्रशासनाकडून घोळ होत असल्याची बाब उघड झाली आहे.
भाईंदर पूर्व येथील आरएमबी पार्क परिसरातील महापालिकेच्या शौचालयात चक्क बाजूबाजूला शौचासन (संडासची भांडी) बसवण्यात आल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकप्रकारे उघड्यावरच बाजूबाजूला बसून याचा वापर करावा का, असा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. विशेष म्हणजे, किमान दोन भांड्यांदरम्यान पडदा लावण्याऐवजी समोरच पडदा लावण्यात आल्याची हास्यास्पद बाबही निदर्शनास आली आहे. त्यामुळे नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेकडून लाखो रुपये खर्च केले जात असताना प्रत्यक्ष वापराचा विचार केला जात नाही, असा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. दरम्यान, संबंधित ठिकाणी हे महापालिकेचे जुने शौचालय असून तेथे केवळ दुरुस्तीचे काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. कामात काही त्रुटी आढळल्यास त्याबाबत माहिती घेऊन योग्य उत्तर दिले जाईल, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
इतर शौचालयांची दुरवस्था
मिरा-भाईंदर शहरात महापालिकेच्या सार्वजनिक शौचालयांची देखील दूरवस्था झाली असल्याची बाब समोर आली आहेत. शौचालयात घाणीचे साम्राज्य पसरले असून दरवाजे खिडक्या देखील मोडकडीस आले आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन ठोस धोरण निश्चित करावे अशी मागणी भाजप नगरसेवक रवी व्यास यांनी केली आहे.
