भाईंदर :- मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन सेवेत पीएमई बस योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या १०० इलेक्ट्रिक बसपैकी पहिल्या टप्प्यात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात २५ बस दाखल होणार आहेत. त्यामुळे शहरातील गर्दीच्या मार्गांवरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. मिरा-भाईंदर महापालिकेची स्वतंत्र परिवहन सेवा असून ती सध्या खासगी कंत्राटदारामार्फत चालवली जाते. पालिकेकडे सध्या ७४ डिझेल व ५७ इलेक्ट्रिक अशा एकूण १३१ बस आहेत.
मात्र, परिवहन सेवेचा दररोज एक लाखांहून अधिक प्रवासी वापर करत असल्याने उपलब्ध बस अपुऱ्या पडत आहेत. ही बाब लक्षात घेऊन महापालिका प्रशासनाने केंद्र शासनाकडे पीएमई बस योजनेअंतर्गत लहान, मध्यम आणि मोठ्या आकाराच्या आणखी १०० इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर पहिल्या टप्प्यात २५ बस ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेला मिळणार आहेत. उर्वरित बस दिवाळीपर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध होणार आहेत.या पार्श्वभूमीवर परिवहन विभागाने आवश्यक तयारी सुरू केली असून नव्या बस सेवेसाठी चालक व वाहकांची संख्या वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
नव्या बस खरेदीसाठी हालचाली.
मिरा-भाईंदर महापालिकेच्या परिवहन ताफ्यातील डिझेल बसना १० वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाल्याने त्या टप्प्याटप्प्याने सेवेतून बाद होणार आहेत. तसेच शहरातील वाढती प्रवासी संख्या लक्षात घेता किमान ३२० बसांची आवश्यकता असल्याचे परिवहन विभागाचे मत आहे. त्यामुळे केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या १०० इलेक्ट्रिक बसांव्यतिरिक्त आणखी १०० सीएनजी बस जीसीसी तत्त्वावर घेण्याची मागणी स्थायी समितीचे सभापती हसमुख गेहलोत यांनी केली आहे. त्यावर प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत आवश्यक कार्यवाही सुरू केली आहे.
