भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिकेने गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि अन्य सार्वजनिक उत्सवांसाठी रस्ते व पदपथांवर तात्पुरते मंडप उभारण्यासंदर्भात नियमावली जाहीर केली आहे. यंदा मंडप परवानगीसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. मात्र, मंडप उभारण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करून आवश्यक ना-हरकत प्रमाणपत्रे सादर करणे बंधनकारक आहे.

मिरा भाईंदर शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व नवरात्रौत्सव मोठ्या उत्सहात साजरा केला जातो.यात जवळपास दोनशेहुन अधिक सार्वजनिक गणेश मंडळ रस्त्यावर मंडप उभारून मूर्तीची प्रतिस्थापना करतात.यासाठी पालिकेकडून परवानगी देऊन शुल्क आकारले जाते.त्यावरून आता या सनांना सवलत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.त्यावरून गेल्या दहा वर्षांत कोणतीही तक्रार अथवा नियमभंगाची नोंद नसलेल्या मंडळांना पाच वर्षांची मंडप परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मंडपाची रुंदी रस्त्याच्या एकूण रुंदीच्या एकचतुर्थांशपेक्षा अधिक नसावी.

सार्वजनिक वाहतूक मार्गावर वाहनांच्या वाहतुकीसाठी किमान १२ फूट जागा मोकळी ठेवावी लागणार असून, आठ फूट किंवा त्यापेक्षा कमी रुंदीच्या रस्त्यावर मंडप उभारण्यास परवानगी दिली जाणार नाही.मंडप उभारताना विद्युत तार आणि डीपी बॉक्सपासून किमान सहा फूट अंतर ठेवणे आवश्यक आहे. काँक्रीट किंवा पेव्हर ब्लॉकच्या रस्त्यांवर खोदकाम करण्यास बंदी असून, नियमभंग केल्यास कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची जाहिर सूचना महापालिकेची अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांनी जाहिर केले आहे.

पर्यावरण पुरक उत्सवाला प्रोसाहन

पर्यावरणाच्या दृष्टीने शाडू माती अथवा पर्यावरणपूरक मूर्ती वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सहा फूटांपेक्षा कमी उंचीच्या मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच करावे लागणार आहे. थर्माकोल, एकदाच वापरता येणारे प्लास्टिक आणि प्लास्टिकच्या फलकांवर बंदी घालण्यात आली आहे. मंडप परिसरात ओला, सुका आणि घातक कचऱ्यासाठी स्वतंत्र कचरापेट्या ठेवणे बंधनकारक असेल.

समितीकडून मंडपांची पाहणी :-

मंडपाना पथदिव्यांच्या खांबावरून थेट वीज घेण्यास बंदी असून, ध्वनिक्षेपकासाठी पोलिसांची परवानगी आवश्यक आहे. उत्सवाच्या सात दिवस आधी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती मंडपांची पाहणी करणार आहे. विनापरवानगी किंवा नियमांचे उल्लंघन करून उभारलेले मंडप तातडीने हटवून संबंधित आयोजकांवर कारवाई केली जाणार आहे.