भाईंदर: मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या बस डेपोत कचरा संकलनासाठी खरेदी करण्यात आलेल्या नव्या घंटागाड्या वापराविना पडून असल्याचे समोर आले आहे. तब्बल दहा घंटागाड्या घोडबंदर येथील डेपोत उभ्या असून, दीर्घकाळ वापर न झाल्याने या वाहनांची दुरवस्था होऊ लागली आहे.
मिरा-भाईंदर शहरातील कचरा संकलन व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महापालिकेने नवीन वाहने खरेदी केली आहेत. त्यामध्ये या दहा घंटागाड्यांचा समावेश आहे. मंत्री प्रताप सरनाईक यांच्या विशेष निधीतून ही वाहने खरेदी करण्यात आल्याचे वाहनांवर नमूद आहे. मात्र, खरेदीनंतर ही वाहने अद्याप वापरात न आणता घोडबंदर येथील डेपोत उभी करण्यात आली आहेत.
या घंटागाड्यांच्या मागील बाजूस कचरा साठवण्यासाठी असलेल्या भागात पावसाचे पाणी साचले आहे. त्यामुळे लोखंडी भागांना गंज चढत असल्याचे चित्र आहे.तसेच दीर्घकाळ वाहने वापराविना पडून राहिल्यास त्यांची दुरवस्था होण्याबरोबरच देखभालीचा खर्चही वाढण्याची शक्यता आहे.या घंटागाड्यांची अद्याप वाहन नोंदणी झालेली नसल्याचा दावाही करण्यात येत आहे. नोंदणी पूर्ण झाली नसल्यास ही वाहने रस्त्यावर कधी उतरविण्यात येणार, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कचरा संकलनासाठी वाहने खरेदी करून ती वापराविना पडून राहत असतील, तर वाहन खरेदीचा उद्देश काय, असा सवालही उपस्थित होत आहे.
या घंटागाड्या नेमक्या कधी खरेदी करण्यात आल्या, त्यासाठी किती निधी खर्च करण्यात आला, त्यांची नोंदणी का झाली नाही आणि ती वाहने सेवेत कधी आणली जाणार, याबाबत महापालिकेचे उपायुक्त सचिन बांगर यांना विचारणा केली असता त्यांनी लवकरच माहिती देण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.
