भाईंदर :- शहरातील स्वच्छतेची पातळी अधिक उंचावावी आणि कचरा व्यवस्थापनाबाबत नियमांचे काटेकोर पालन व्हावे यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने ‘शून्य कचरा’ मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांचा सहभाग वाढवण्यावर प्रशासनाने भर दिला आहे.

स्वच्छ सर्वेक्षण उपक्रमात मागील काही वर्षांपासून मिरा भाईंदर महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. तीन लाख ते दहा लाख लोकसंख्या गटात देशपातळीवर प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान महापालिकेला मिळाला आहे. ही कामगिरी कायम राखण्यासाठी २०२५-२६ च्या स्वच्छ सर्वेक्षणासाठी प्रशासनाने ‘शून्य कचरा’धोरण स्वीकारले आहे.

या अंतर्गत कचरा वर्गीकरण, कचऱ्यावर प्रक्रिया, तसेच विविध स्वच्छता उपक्रम राबविण्यास प्रोत्साहन दिले जात आहे. प्लास्टिक वस्तूंचा वापर टाळणे, पुनर्वापराला चालना देणे आणि नागरिकांच्या सवयींमध्ये बदल घडवून आणणे यासाठी महानगरपालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत.
नागरिकांचा सहभाग वाढवण्यासाठी सातत्याने जनजागृती केली जात असून रस्ते, निवासी गृहसंकुल, उद्याने, सभागृहे, समुद्रकिनारे तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखण्यावर प्रशासनाचे विशेष लक्ष आहे.

एलईडी स्क्रीनद्वारे जनजागृती

शहरातील नागरिकांना स्वच्छतेचे नियम समजावेत आणि योग्य उपाययोजना कशा राबवाव्यात यासाठी महापालिकेकडून विविध माध्यमांतून जनजागृती केली जात आहे. शहरातील चौकांमध्ये एलईडी स्क्रीन बसवून स्वच्छता, प्लास्टिक वापर टाळणे, पुनर्वापरयोग्य वस्तूंचा वापर वाढवणे तसेच बांधकाम स्थळी घ्यावयाच्या खबरदारीबाबत माहिती प्रसारित केली जात आहे.