भाईंदर : मिरा भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पाण्याच्या बाटल्यांचे उशिराने वाटप झाल्याचा मुद्दा ताजा असतानाच आता विद्यार्थ्यांसाठी करण्यात आलेल्या बूट खरेदीत सुमारे ३५ लाख रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. उत्पादक कंपनीकडून १६० रुपयांना उपलब्ध होणारे बूट महापालिकेने ठेकेदारामार्फत तब्बल ५०० रुपयांना खरेदी केल्याचा आरोप करण्यात आला असून, या प्रकरणाची लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मिरा भाईंदर महापालिकेच्या एकूण ३२ शाळा असून, त्यामध्ये जवळपास नऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये प्रामुख्याने सर्वसामान्य आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांतील मुले शिक्षण घेत असल्याने त्यांना महापालिकेकडून मोफत शैक्षणिक साहित्य पुरविण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी महापालिकेने स्वतंत्र शिक्षण धोरण निश्चित केले असून, त्यावर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहेत. मात्र, शैक्षणिक साहित्याच्या खरेदी प्रक्रियेवरून आता प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.
महापालिकेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांसाठी शालेय दप्तर, बूट आणि मोजे खरेदी करण्यासाठी दोन कोटी ४३ लाख ६० हजार रुपयांची निविदा काढली होती. त्यानुसार हे कंत्राट मे. नवकार युनिफॉर्म या संस्थेला देण्यात आले. या खरेदी प्रक्रियेत प्रत्येक जोडी बुटासाठी ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. मात्र, ठेकेदाराने पुरविलेले बूट सोनॅक्सो फुटवेअर्स प्रा. लि. या उत्पादक कंपनीकडून थेट १६० रुपये प्रति जोडी दराने उपलब्ध होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. यासंदर्भातील बिले आणि कागदपत्रांच्या आधारे माहिती अधिकार कार्यकर्ते कृष्णा गुप्ता यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दिली आहे.
या दोन्ही दरांमध्ये प्रति जोडी ३४० रुपयांची तफावत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. एकूण १० हजार २७५ विद्यार्थ्यांच्या बूट खरेदीचा विचार करता ही रक्कम ३४ लाख ९३ हजार ५०० रुपयांपर्यंत पोहोचत असल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदार यांनी संगनमत करून महापालिकेच्या निधीचे नुकसान केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेतील दरनिश्चिती, प्रत्यक्ष पुरवठा आणि संबंधित आर्थिक व्यवहारांची चौकशी करून दोषींवर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार कारवाई करावी, अशी मागणी गुप्ता यांनी केली आहे.
” या संपूर्ण प्रकरणाची निविदा समिती मार्फत चौकशी केली जाणार आहे. त्यात गैरप्रकार समोर आल्यानंतर आयुक्तांच्या आदेशानुसार पुढील निर्णय घेतला जाईल.”- सचिन बांगर – अतिरिक्त आयुक्त ( शिक्षण विभाग )
