भाईंदर : मिरा-भाईंदर महापालिकेच्या शाळांमधील पटसंख्या स्थिर करण्यासाठी कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. या निर्णयाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवासासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार असून सुरुवातीला हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात येणार आहे.
मिरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात एकूण ३६ शाळा असून त्यामध्ये मराठी, हिंदी, उर्दू आणि गुजराती माध्यमांतील सुमारे साडेनऊ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. प्रामुख्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थी या शाळांमध्ये शिकत असल्याने त्यांना दर्जेदार आणि सर्वांगीण शिक्षण उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनावर आहे.
मात्र काही शाळांमधील वर्गांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे, तर काही शाळा केवळ एका शिक्षकावर चालवल्या जात आहेत. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ताण येत असून शैक्षणिक व्यवस्थापनातही अडचणी निर्माण होत आहेत. कमी विद्यार्थी संख्येमुळे अनेक ठिकाणी वेगवेगळ्या इयत्तांतील विद्यार्थ्यांना एकाच वर्गात बसवावे लागत आहे.
या पार्श्वभूमीवर महापालिकेने कमी पटसंख्या असलेल्या शाळांचे एकत्रीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. इयत्तेनुसार विद्यार्थ्यांचे स्थलांतर करून वर्गसंख्या स्थिर करण्यात येणार असून त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक चांगले शैक्षणिक वातावरण मिळण्यास मदत होणार आहे. तसेच शिक्षकांवरील ताणही कमी होणार असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांच्या ये-जा व्यवस्थेसाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात येणार आहे. सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम राबविण्यात येणार असून त्याला यश मिळाल्यास संपूर्ण शहरात ही योजना लागू केली जाईल, अशी माहिती आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी दिली.
या ठिकाणी होणार प्रयोग :
उत्तन येथील उत्तन मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते तिसरीमधील २३ विद्यार्थी तसेच डोंगरपाली मराठी शाळेतील दुसरी ते तिसरीमधील २५ विद्यार्थ्यांना चौक येथील मराठी माध्यमाच्या शाळेत स्थलांतरित करण्यात येणार आहे.तसेच भाईंदर पूर्वेतील बंदरवाडी येथील मराठी व हिंदी माध्यमाच्या इयत्ता पहिली ते सातवीतील विद्यार्थ्यांना नवघर येथील शाळेत हलविण्यात येणार आहे. याशिवाय घोडबंदर येथील रेनिवदर मराठी शाळेतील इयत्ता पहिली ते चौथीमधील ३६ विद्यार्थ्यांचे घोडबंदर मराठी शाळेत स्थलांतर करण्यात येणार आहे. या निर्णयासंदर्भात पालकांची बैठक घेऊन त्यांना योजनेची माहिती देण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
