भाईंदर : भाईंदरच्या मुर्धा गावात प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी नव्याने उभारण्यात आलेली विद्युत दाहिनी उद्घाटन झाल्यापासूनच बंद असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका नयना म्हात्रे यांनी महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत केला. पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने ही दाहिनी बंद ठेवण्यात आली असून, गेल्या चार महिन्यांपासून कर्मचारी उपलब्ध करून देण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून त्याची दखल घेतली जात नसल्याचे त्यांनी सांगितले.

मिरा-भाईंदर शहरात मोकाट फिरणाऱ्या श्वान, मांजर तसेच अन्य जनावरांची संख्या मोठी आहे. या प्राण्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेने उत्तन येथे निर्बीजीकरण केंद्र उभारले असून, उपचारांसाठी दवाखानाही सुरू केला आहे. मात्र एखाद्या प्राण्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेकडे स्वतंत्र सुविधा उपलब्ध नव्हती. त्यामुळे मृत प्राण्यांच्या अंत्यविधीचा प्रश्न निर्माण होत होता.

या पार्श्वभूमीवर पाळीव तसेच मृत प्राण्यांच्या अंत्यविधीसाठी स्वतंत्र विद्युत दाहिनी उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला. यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी शासनाकडे पाठपुरावा करून महापालिकेला निधी उपलब्ध करून दिला. त्यानुसार मुर्धा आणि भाईंदरच्या नवघर गावात विद्युत दाहिनी उभारण्यात आली आहे.

नवघर येथील विद्युत दाहिनीचे उद्घाटन मागील वर्षी करण्यात आले, तर मुर्धा येथील दाहिनीचे उद्घाटन मे २०२६ मध्ये झाले. मात्र मुर्धा येथील दाहिनी उद्घाटनापासूनच बंद असल्याचा आरोप नयना म्हात्रे यांनी गुरुवारी झालेल्या महासभेत केला. संबंधित स्मशानभूमीत पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे दाहिनी सुरू करता आलेली नसल्याचे त्यांनी सांगितले.

गेल्या चार महिन्यांपासून कर्मचारी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करीत असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले. मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने मृत प्राण्यांना नाईलाजाने स्मशानभूमीच्या परिसरात पुरावे लागत असल्याचे त्यांनी महापौर डिंपल मेहता यांच्या निदर्शनास आणून दिले. या प्रकरणाची दखल घेत महापौर डिंपल मेहता यांनी संबंधित स्मशानभूमीत आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करण्याचे आदेश दिले.