भाईंदर : मिरा भाईंदरमधील जुन्या गावांतील घरांच्या पुनर्बांधणीचा प्रश्न आणि गावठाणे तसेच आदिवासी पाडे संरक्षित करण्याच्या दृष्टीने गुरुवारी नगरविकास विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या या दौऱ्याची माहिती मात्र महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना देण्यात आली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

मिरा भाईंदरमधील जुन्या गावांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना विविध शासकीय नियमांमुळे त्यांच्या जुन्या घरांची पुनर्बांधणी किंवा दुरुस्ती करताना अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक गावकरी परवानगी न घेता घरांची दुरुस्ती किंवा पुनर्बांधणी करीत आहेत. मात्र ही बांधकामे अनधिकृत ठरत असल्याने महापालिकेकडून त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. काही दिवसांपूर्वी मुर्धा येथील एका घरावर महापालिका प्रशासनाने केलेल्या कारवाईवरून मोठा वाद निर्माण झाला होता. ही कारवाई सत्ताधारी भाजपच्या दबावाखाली झाल्याचा आरोप स्थानिक गावकऱ्यांनी केला होता.
या पार्श्वभूमीवर स्थानिक गावकऱ्यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या माध्यमातून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन जुन्या गावांतील भूमिपुत्र आणि आदिवासी पाडे संरक्षित करण्यासाठी स्वतंत्र धोरण आखण्याची मागणी केली होती. त्यानंतर शिंदे यांनी याबाबत आवश्यक पावले उचलण्याचे निर्देश नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार गुरुवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, नगरविकास विभागाचे वरिष्ठ अधिकारी, महापालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा तसेच महसूल आणि वन विभागाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत पाहणी दौरा झाला. उत्तन किनारपट्टीपासून या दौऱ्याला सुरुवात झाली. त्यानंतर राई, मुर्धा, घोडबंदर परिसरातून पाहणी करण्यात आली. ठाण्यातील काजूपाडा परिसरात या दौऱ्याची सांगता झाली.

मात्र महायुतीची सत्ता असलेल्या मिरा भाईंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या स्थानिक लोकप्रतिनिधींनाच या दौऱ्याची माहिती देण्यात आली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महापौर किंवा स्थानिक लोकप्रतिनिधींचा संवाद होऊ शकला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा दौरा आयोजित केल्याने त्याबाबत आपल्याला कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याचे स्थानिक भाजप लोकप्रतिनिधींनी सांगितले.नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांनीही आम्हाला दौऱ्याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. याबाबत काही आवश्यक असल्यास आम्ही थेट त्यांच्याशी संपर्क साधू,अशी प्रतिक्रिया महापालिकेचे उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी दिली.