भाईंदर :- पावसाळा तोंडावर आल्याने मिरा-भाईंदर शहरात नालेसफाईच्या कामांना वेग देण्यात आला आहे. मात्र अनेक बंदिस्त नाल्यांची योग्य प्रकारे सफाई होत नसल्याचा आरोप नागरिकांसह सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींनी केला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाच्या वेळी शहरात पाणी साचण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

मिरा-भाईंदर शहरात सुमारे १५० लहान-मोठे नाले असून पावसाळ्यापूर्वी त्यांची नियमित स्वच्छता केली जाते. यासाठी महापालिकेकडून अडीच कोटी रुपयांहून अधिक खर्च करण्यात येत असून संबंधित कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. यंदाही एप्रिल महिन्याच्या अखेरीपासून नालेसफाईची मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, शहरातील सुमारे ७५ नाले हे जवळपास ५० किलोमीटर लांबीपर्यंत बंदिस्त स्वरूपात बांधण्यात आले आहेत. या नाल्यांची सफाई करताना संबंधित कंत्राटदार केवळ काही ठिकाणची झाकणे उघडून वरवरची सफाई करत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. त्यामुळे नाल्यांमध्ये साचलेला मोठ्या प्रमाणातील गाळ तसाच राहिल्याचे नागरिकांचे आरोप आहेत.

तसेच गणेश देवल नगर, विनायक नगर, दीपक हॉस्पिटल परिसर, लोढा रोड, मोती नगर, काशिगाव तसेच इतर काही भागांतील प्रमुख नाल्यांची अद्याप प्रभावी साफसफाई झालेली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. परिणामी, अतिवृष्टी झाल्यास शहरातील अनेक भाग जलमय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शहरातील नालेसफाईचे काम नियोजनानुसार सुरू असल्याचा दावा केला आहे. ज्या भागांमध्ये नालेसफाईबाबत तक्रारी असतील, त्या भागातील नागरिकांनी प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही विभागाकडून करण्यात आले आहे.

कच्च्या-नाल्याच्या उभारणीवर आक्षेप :-

भाईंदर पश्चिम ते मिरा रोड पश्चिम परिसरात मोठ्या प्रमाणात भूभराव करण्यात आला असून पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी कच्चे नाले खोदण्यात आले आहेत. मात्र या भागात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने, त्या तुलनेत नाल्यांची रुंदी आणि खोली अपुरी असल्याचा आरोप उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी केला आहे. यामुळे भविष्यात पावसाळ्यात नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.