भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात रस्त्याच्या कडेला गॅसचा वापर करून खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात पोलिसांनीही सक्त पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या संदर्भात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

मिरा भाईंदर शहरात अनधिकृत फेरीवाल्यांची संख्या वाढत आहे. हे फेरीवाले पदपथ आणि रस्ते अडवून बसत असल्यामुळे वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे अशा फेरीवाल्यांच्या हातगाड्या जप्त करून त्यांना हटवण्याची मोहीम महापालिकेने मागील महिन्यापासून सुरू केली आहे. प्रशासनाची ही कारवाई सुरू असतानाच आता पोलीस प्रशासनही फेरीवाल्यांविरोधात आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

भाईंदर पश्चिम येथील साठ फूट रोडवर खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या एका फेरीवाल्यावर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पदपथ अडवणे तसेच ज्वलनशील वस्तूंचा (गॅस) वापर करून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम २८७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे फेरीवाल्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अचानक कारवाई का?
मिरा भाईंदर शहरात गेल्या अनेक वर्षांपासून रस्त्यावर हातगाड्या लावून खाद्यपदार्थांची विक्री केली जात आहे. जगप्रसिद्ध वडापावदेखील रस्त्यावरच विकला जातो. मात्र इतकी वर्षे कोणतीही ठोस कारवाई न करणाऱ्या पोलिसांनी नेमके आताच कारवाई का सुरू केली आणि ती भविष्यात सातत्याने सुरू राहणार का, असा संतप्त सवाल फेरीवाला संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.