भाईंदर :-मिरा भाईंदर शहरात पोलीस भरतीसाठी येणाऱ्या उमेदवारांसाठी तात्पुरत्या राहण्याची सोय करण्याच्या सूचना नवनिर्वाचित महापौरांनी भर महासभेत प्रशासनाला दिल्या होत्या.मात्र, त्यास आठवडा उलटून गेल्यानंतरही कोणतीही उपाययोजना प्रशासनाने आखलेली नसल्याने नाईलाजास्तव उमेदवारांना जीव मुठीत धरून रस्त्यावर झोपण्याची वेळ आली आहे.

मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालय अंतर्गत पोलीस भरती प्रक्रिया राबवली जात आहे. आयुक्तालयाच्या स्थापनेनंतरची ही दुसरी भरती प्रक्रिया आहे. त्यानुसार उमेदवारांची शारीरिक चाचणी परीक्षा भाईंदर पश्चिम येथील सुभाषचंद्र भोसले मैदान येथे घेतली जात आहे. या भरती प्रक्रियेत राज्यभरातून उमेदवार सहभागी होत असल्याने परीक्षेसाठी आलेल्या काही गरजू उमेदवारांची राहण्याची तसेच खाण्यापिण्याची मोठी गैरसोय होत आहे.परिणामी, शारीरिक परीक्षा पूर्ण होईपर्यंत दोन-तीन दिवस हे उमेदवार मैदानाबाहेरील परिसरात उन्हातानात बस्तान मांडून बसलेले दिसतात. काही सामाजिक संस्थांकडून त्यांना अन्न पुरवले जात असले, तरी राहण्याची समस्या कायम आहे.

दरम्यान, अशा उमेदवारांसाठी तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करावी, अशी मागणी नुकत्याच पार पडलेल्या महापालिका महासभेत लोकप्रतिनिधींनी केली होती. ही बाब आपल्या निदर्शनास आली असून महापालिका प्रशासनाने शक्य ते सहकार्य करावे, अशा सूचना महापौर डिंपल मेहता यांनी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांना दिल्या होत्या. मात्र, सूचना देऊन आठवडा उलटूनही उमेदवार रस्त्यावर झोपत असल्याचे चित्र दिसत आहे. उमेदवारांना होत असलेल्या गैरसोयीबाबत काँग्रेस युवा पदाधिकारी सिद्धेश राणे यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला.

म्हणून गैरसोय

मिरा भाईंदर शहरात पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांसाठी महापालिकेकडून मैदानाजवळील समाज मंदिरात राहण्याची सोय केली जात होती. सदर इमारत पूर्णवेळ उमेदवारांसाठी खुली ठेवली जात होती. मात्र, मागील वर्षापासून हे समाजमंदिर प्रशासनाने पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्याचे काम हाती घेतले आहे. त्यामुळे सध्या उमेदवारांना पर्यायी जागा कोणती द्यावी, असा प्रश्न प्रशासनासमोर निर्माण झाला आहे.