भाईंदर :- भाईंदर पूर्व येथे असलेले टपाल कार्यालय अचानक बंद करण्यात आले आहे. यामुळे नागरिकांना भाईंदर पश्चिम तसेच मीरारोड येथे पायपीट करण्याची वेळ आली असून मोठी गैरसोय होत आहे.मिरा भाईंदर शहरात भारतीय टपालाची तीन कार्यालये आहेत.यातील एक कार्यालय मिरा रोड आणि दोन भाईंदर पूर्व व पश्चिम भागात आहे.

या कार्यालयात स्पीड पोस्ट, पत्र पाठवणे तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी अनेक नागरिक येत असतात. यात प्रामुख्याने पैसे जमा करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची संख्या लक्षणीय वाढली आहे. मात्र मागील काही दिवसापासून भाईंदर पूर्व भागात असलेले टपाल कार्यालय अचानक बंद करण्यात आले असल्याचे समोर आले आहे.

यापूर्वी हे कार्यालय भाईंदरच्या बी.पी रोड भागात होते.मात्र तेथील इमारत धोकदायक झाल्यामुळे तीन वर्षांपूर्वी हे कार्यालय जेसल पार्क येथे हलवण्यात आले होते. कार्यालयाची जागा मोठी असल्यामुळे येथे भेट देणाऱ्या नागरिकांची संख्या देखील वाढली होती.परंतु आता अचानक हे कार्यालय बंद करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी टपाल कार्यालयाशी संबंधित असलेल्या कामासाठी भाईंदर पश्चिम किंवा मिरा रोड येथे जाण्याची सूचना असलेले फलक बंद कार्यालयाबाहेर लावण्यात आले आहे.

यामुळे नागरिकांना आता मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. मिळालेल्या माहितीनुसार सदर कार्यालय हे भाडेतत्वावर घेण्यात आले होते. त्यामुळे काही तरी अडचण निर्माण झाल्यामुळे तात्पुरते कार्यालय बंद करण्यात आले असून नवीन जागेचा शोध घेतला जात असल्याची माहिती कार्यालय शेजारी नागरिकांकडून देण्यात आली आहे.

भाईंदर पश्चिम च्या कार्यालयावर ताण :-

भाईंदर पूर्व येथील टपाल कार्यालय बंद झाल्यामुळे मोठ्या संख्येने नागरीक भाईंदर पश्चिम येथील कार्यालयात येत आहेत.त्यामुळे येथील कार्यालयात कामाचा ताण वाढला आहे.परंतु त्या तुलनेत मनुषबळ नसल्यमुळे नागरिकांची मोठी रांग लागत आहे. ही रांग इतकी मोठी असते की यात काम करून घेण्यास नागरिकांना आपला एक ते दिड तास खर्ची करावा लागत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.