भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील खड्डेमय रस्ते, निकृष्ट दर्जाची रस्त्यांची कामे आणि नागरिकांना होणाऱ्या त्रासाच्या विरोधात काँग्रेसचे ‘रील फॉर रोड- मिरा-भाईंदर रील स्पर्धा २०२६’ या उपक्रमाची घोषणा केली आहे. शहरातील रस्त्यांची वस्तुस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आणण्यासाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.

मिरा-भाईंदरमध्ये रस्त्यांच्या विकासावर कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचे दावे केले जात असले, तरी पहिल्याच पावसात अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आपल्या परिसरातील खड्डे, खराब रस्ते आणि त्यामुळे होणारा त्रास यावर आधारित रील तयार करून सोशल मीडियावर ‘#ReelForRoads’ हा हॅशटॅग वापरून पोस्ट करावी, तसेच संबंधित रील आयोजकांकडे ई-मेलद्वारे पाठवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

ही स्पर्धा मान्सून कालावधीत होणार असून ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निकाल जाहीर केला जाणार आहे. स्पर्धेतील प्रथम क्रमांकाच्या विजेत्यास मेडिकल इन्शुरन्स, द्वितीय क्रमांकाच्या विजेत्यास कार इन्शुरन्स, तर तृतीय क्रमांकाच्या विजेत्यास बाईक इन्शुरन्स देण्यात येणार आहे. तसेच निवडक सहभागी नागरिकांना हेल्मेट आणि प्रथमोपचार किट देऊन सुरक्षित वाहतुकीबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याचे आयोजक काँग्रेस गटनेते जय ठाकूर यांनी सांगितले आहे.