भाईंदर :-मिरा रोड येथील बालाजी हॉटेल परिसरात रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे कोणत्याही क्षणी अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे.
मिरा भाईंदर शहरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण व डांबरीकरण करण्यासाठी महापालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.तरी देखील पावसाळ्यात या रस्त्यांवर खड्ड्यांची समस्या निर्माण होत असते. त्यामुळे दरवर्षी पुन्हा खड्डे बुजवण्यासाठी जवळपास पाच कोटी रुपये खर्च केले जातात. परंतु यानंतरही ही समस्या मार्गी लागत नाही. प्रामुख्याने खड्ड्यांची समस्या पावसाळ्यात अधिक प्रमाणात जाणवते.
मात्र, आता उन्हाळ्यातदेखील शहरात प्रवाशांना खड्ड्यांचा त्रास होत असल्याचे समोर आले आहे. सिल्वर पार्क येथील बालाजी हॉटेलच्या चौकात मुख्य रस्त्यावर विविध ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे दुचाकीस्वारांचा प्रवास करताना अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
याचप्रमाणे मिरा भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवर तसेच काही अन्य ठिकाणीही असे खड्डे दिसून येत आहेत. मागील वर्षी अशाच खड्ड्यांमुळे जवळपास तीन जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे शहरातील खड्डे तातडीने भरावेत, अशी मागणी प्रवासी समाजमाध्यमांवर फोटो पोस्ट करून करत आहेत.दरम्यान, शहरातील बहुतांश खड्डे भरून काढण्यात आले असून एखाद्या ठिकाणी खड्डा असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास तो तातडीने भरला जाईल, अशी माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.
