भाईंदर : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील जाफरी खाडीमार्गातून वाहणाऱ्या मोठ्या नाल्याच्या सफाईचे काम अखेर प्रशासनाने हाती घेतले आहे. त्यामुळे अतिवृष्टीदरम्यान रेल्वे रुळ पाण्याखाली जाण्याचा धोका कमी होण्याची शक्यता आहे.भाईंदर रेल्वे मार्गिकेला लागून जाफरी खाडी पात्रातून वाहणारा एक नैसर्गिक नाला आहे. या नाल्यामार्फत मिरा रोड परिसरातील पाणी वाहून भाईंदरच्या खाडी पात्रात जाऊन मिळते. मात्र, या नाल्याचा काही भाग रेल्वे मार्गिकेच्या हद्दीत येतो. पूर्वी संपूर्ण नाल्याची सफाई मिरा भाईंदर महापालिकेमार्फत केली जात होती. परंतु, काही वर्षांपूर्वी रेल्वे प्रशासनाने मार्गिकेभोवती दोन्ही बाजूंनी उंच भिंत उभारून परिसर बंद केला. त्यामुळे रेल्वे हद्दीत येणाऱ्या नाल्याच्या सफाईचा प्रश्न निर्माण झाला होता.परिणामी, पावसाळ्यात रेल्वे रुळांवरील खडी नाल्यात वाहून जाऊन पाण्याचा प्रवाह अडत होता. त्यामुळे भाईंदर पूर्वेतील कॅबिन रोड परिसरात पाणी तुंबण्याची समस्या निर्माण होत होती.
हा प्रश्न सोडवण्यासाठी महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील यांनी काही दिवसांपूर्वी विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), मुंबई रेल्वे विकास प्राधिकरणाचे अधिकारी, महापालिका आयुक्त आणि इतर अधिकाऱ्यांसोबत पाहणी दौरा केला होता. या वेळी रेल्वे हद्दीतील नाल्यांची साफसफाई करणे आवश्यक असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज सिंग यांनी महापालिकेला नालेसफाईसाठी ना हरकत परवानगी देण्याचा निर्णय घेतला.त्यावरून मागील तीन दिवसांपासून पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून नाल्यांची साफसफाई सुरू असल्याची माहिती नगरसेवक राकेश शाह यांनी दिली.
भिंतीत दरवाजा उभारण्याचा प्रस्ताव
रेल्वे हद्दीतील नाल्यांची साफसफाई करताना यांत्रिक साधनांचा वापर करणे शक्य नसल्याने कामगारांच्या मदतीने प्रत्यक्ष नाले साफ करावे लागत आहेत. रेल्वे मार्गिकेत प्रवेश करण्यासाठी कर्मचाऱ्यांना लांबच्या रेल्वे स्थानकातून जावे लागत असल्याने कामास अधिक वेळ लागत आहे. तसेच कर्मचाऱ्यांना वारंवार ये-जा करावी लागत आहे.या पार्श्वभूमीवर रेल्वेच्या भिंतीत फाटकाजवळ दरवाजा उभारण्याची मागणी महापालिकेकडून करण्यात आली आहे. यासंदर्भातील प्रस्ताव नुकताच रेल्वे प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे.
