भाईंदर : मिरा भाईंदर शहरात उंदरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढल्याचे दिसून येत आहे. रस्त्यांच्या कडेला, उद्यानांमध्ये तसेच विविध सार्वजनिक ठिकाणी उंदीर माती पोखरून बिळे करत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात उंदीर आढळत असल्यामुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे.

मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून नागरिकांना स्वच्छ आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे ही महापालिकेची जबाबदारी आहे. यासाठी प्रशासनाकडून नियमित स्वच्छता, औषध फवारणी आणि लसीकरण मोहिमा राबविल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र, या उपाययोजना सुरू असतानाही डासांप्रमाणेच उंदरांचा त्रास वाढल्याचे चित्र आहे.

उंदरांची संख्या सातत्याने वाढत असल्याने घरांमध्ये, सोसायट्यांच्या आवारात, रस्त्यांलगतच्या झाडांभोवतीच्या मातीत, उद्यानांत आणि इतर ठिकाणी त्यांचा सुळसुळाट दिसून येत आहे. यामुळे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळे निर्माण होत आहेत. काही महिन्यांपूर्वी उंदरांनी तारा कुरतडल्यामुळे टपाल कार्यालयाचे कामकाज एक दिवस ठप्प झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे येत्या काळात ही समस्या अधिक गंभीर होऊ नये, यासाठी तातडीने उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

आजारांचा धोका :

अस्वच्छता आणि अन्नाचा सहज उपलब्ध साठा असल्यास उंदरांची संख्या झपाट्याने वाढते. हे उंदीर मानवी वस्तीत वावरू लागल्यास त्यांच्या अंगावरील जंतूंमुळे प्लेगसारख्या संसर्गजन्य आजारांचा धोका संभवतो. त्यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न उद्भवू नये, यासाठी उंदरांचे निर्मूलन करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

प्रशासनाची मोहीम कागदावरच?

मिरा भाईंदर शहरात उंदरांचे निर्मूलन करण्यासाठी महापालिकेकडून विशेष मोहीम राबविण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. या अंतर्गत कीटकनाशक फवारणी तसेच उंदरांची बिळे बुजविण्याचे काम करण्यात येत होते. मात्र काही दिवसांनंतर या मोहिमेकडे दुर्लक्ष झाल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. दरम्यान, उंदरांचा नायनाट करण्यासाठी सातत्याने कार्यवाही सुरू असल्याचा दावा महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे..