भाईंदर : मिरारोड येथील कांनुगो भागात मलनि:सारण केंद्रातील पाणी नाल्यात सोडल्यामुळे ते थेट रस्त्यावर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. स्थानिक नागरिकांनी गेल्या तीन महिन्यांपासून तक्रारी केल्यानंतरही महापालिका प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे.
मिरारोड पूर्वेत कांनुगो इस्टेट परिसर आहे. या परिसरात मोठी गृहसंकुले असून येथे नागरी वस्ती आहे. दरम्यान, येथील युवराज महाराजा आणि आसपासच्या इमारतींच्या परिसरात मागील तीन महिन्यांपासून दिवसातून दोन वेळा नाल्याचे पाणी साचत आहे. त्यामुळे इमारतीतील नागरिकांना तीव्र दुर्गंधी, डासांचा वाढता उपद्रवाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. याचा परिणाम लहान मुलांच्या आरोग्यावरही होऊ लागला आहे.
सातत्याने पाणी साचत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. या भागातील नाल्यात मलनि:सारण केंद्राचे पाणी सोडले जात असल्यामुळेच पाणी साचत असल्याचे समोर आले आहे. प्रशासनाने दोन-तीन वेळा पाहणी केली असली तरी त्यानंतर कोणतीही सुधारात्मक कारवाई न केल्याचा आरोप स्थानिक रहिवासी जय ठाकूर यांनी केला आहे.
कार्यवाही कागदावरच अडकली
कांनुगो भागातील नाल्यात अचानक साचू लागलेल्या पाण्याची महिनाभरापूर्वी महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती. येथील पावसाळी नाल्यात काही सोसायट्यांचे सांडपाणी तसेच मलनि:सारण केंद्राचे पाणी मिसळत असल्यामुळे ही समस्या निर्माण होत असल्याचा अहवाल घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सहाय्य आयुक्त योगेश गुणीजन यांनी मलनि:सारण विभागाला दिला आहे.मात्र पाणीपुरवठा विभागाने या प्रकरणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्यामुळे समस्या कायम असल्याचे निदर्शनास आले आहे.तर लवकरच प्रशासकीय मान्यता घेऊन संबंधित नाल्याचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.
सांडपाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मिरारोड येथील कांनुगो इस्टेट परिसरातील गृहसंकुलात मलनि:सारण केंद्राचे पाणी सोडले जात असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. घरासमोर साचत असलेल्या या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरातील डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. तसेच या डासांमुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरू लागले आहेत. तर इमारतीतील लहान मुलांच्या आरोग्यावर याचा सर्वाधिक परिणाम होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
