भाईंदर : महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या अमराठी रिक्षाचालकांना व्यावहारिक मराठीचे ज्ञान मिळावे, यासाठी मिरा-भाईंदरमधील सात हजार रिक्षाचालकांना टप्प्याटप्प्याने मराठी भाषा प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येत आहे.त्यावरून शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते शनिवारी लता मंगेशकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात काही रिक्षाचालकांना प्रमाणपत्र देण्यात आले.

मिरा-भाईंदर शहरातील अमराठी रिक्षाचालकांसाठी मराठी भाषा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मराठीतून दैनंदिन व्यवहार करण्यासाठी आवश्यक असलेल्या भाषेचे प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या रिक्षाचालकांना प्रमाणपत्र देण्यात येत असून, या उपक्रमांतर्गत शहरातील सात हजार रिक्षाचालकांना प्रमाणपत्र देण्याचे नियोजन आहे.

यावेळी बोलताना प्रताप सरनाईक यांनी महाराष्ट्रात व्यवसाय करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचालकांना व्यवहारापुरती मराठी भाषा अवगत असणे आवश्यक असल्याचे सांगितले. मराठी भाषा शिकण्यासाठी अमराठी रिक्षाचालकांना आणखी एक वर्षाची मुदत देण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली.राज्यात ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे मराठी भाषा अभियान’ पुन्हा सुरू करण्यात येणार असून, २ ऑक्टोबर २०२६ ते २३ जानेवारी २०२७ या कालावधीत हे अभियान राबवण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत आतापर्यंत १ लाख ६५ हजार ८०० विद्यार्थ्यांना मराठीचे प्रशिक्षण देण्यात आल्याचे सरनाईक यांनी सांगितले.