भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात रिक्षा परवाने देताना बनावट कागदपत्रांचा वापर होत असल्याचे प्रकरण समोर आले असून, या पार्श्वभूमीवर सर्व परवान्यांची पुनर्पडताळणी करण्याचे आदेश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. महिनाभरात याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
मिरा-भाईंदरचे आमदार नरेंद्र मेहता यांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. वांद्रे येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील परिवहन अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीस परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, अतिरिक्त परिवहन आयुक्त भरत कळसकर, उपसचिव चेतन निकम तसेच राज्यभरातील अधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते.
बैठकीत सरनाईक यांनी स्पष्ट केले की, परवाने देण्याची प्रक्रिया ऑनलाइन असली तरी बोगस कागदपत्रांच्या आधारे परवाने दिल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. आमदार मेहता यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेल्या तक्रारीनुसार, मिरा-भाईंदर परिसरात काही परदेशी नागरिकांनी स्थानिक प्रशासनाच्या संगनमताने रहिवासी दाखले मिळवून रिक्षा व टॅक्सी परवाने घेतल्याचे आरोप आहेत.
विशेषतः डाचकुलपाडा व मांडवीपाडा परिसरातील रहिवासी असल्याचे दाखले देताना सादर करण्यात आलेली वीज बिले संशयास्पद असल्याचे निदर्शनास आले आहे.या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर क्षेत्रात विशेष मोहीम राबवून मागील दहा वर्षांत दिलेल्या सर्व रिक्षा परवान्यांची सखोल तपासणी करण्यात येणार आहे.
यासाठी महिनाभर विशेष शिबिर आयोजित करून प्रत्येक कागदपत्राची छाननी केली जाणार असून, आवश्यकतेनुसार अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तपासणीदरम्यान रिक्षा चालकांना मराठी भाषा येणे अनिवार्य असल्याची अटही पडताळून पाहण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
मेहता–सरनाईक वाद
मिरा-भाईंदर शहरातील आमदार नरेंद्र मेहता आणि मंत्री प्रताप सरनाईक हे महायुतीत एकत्र असले तरी दोघेही एकमेकांचे कट्टर विरोधक मानले जातात. नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत दोघांनी एकमेकांवर गंभीर टीका-आरोप केले होते. त्यानंतरही आरोप-प्रत्यारोपांचे सत्र कायम आहे.दरम्यान, मेहता यांनी रिक्षा चालकांबाबत केलेल्या तक्रारीवरूनच परवान्यांची पडताळणी करण्याचे
