भाईंदर : ४ मे रोजी रिक्षा व टॅक्सी चालकांचे आंदोलन होणार असल्याचे वातावरण निर्माण झाल्यामुळे सकाळपासून प्रवाशांनी भीतीपोटी लवकर घराबाहेर पडून प्रवास करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. परिणामी, वाहतूक सुरळीत सुरू असतानाही परिवहन बसगाड्यांमध्ये तसेच इतर ठिकाणी प्रवाशांची गर्दी आणि गोंधळ पाहायला मिळाला.

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषेची सक्ती करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या संदर्भात १ मेपासून कारवाई करण्याचे निर्देश प्रादेशिक परिवहन कार्यालयांना देण्यात आले होते. सुरुवातीला मराठी न बोलणाऱ्या चालकांचे परवाने थेट रद्द करण्यात येतील, असे जाहीर करण्यात आले होते. त्यामुळे शासनाच्या या कठोर निर्णयाच्या विरोधात शहरातील अमराठी रिक्षा-टॅक्सी चालक संघटनांनी ४ मे रोजी आंदोलनाची हाक दिली होती.

दरम्यान, २७ एप्रिल रोजी परिवहन मंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत मराठी सक्तीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच केवळ मराठी येत नसल्यामुळे परवाने रद्द करण्यात येणार नाहीत, असेही स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे जाहीर केलेले आंदोलन स्थगित करण्यात आले.
मात्र, आंदोलनाच्या घोषणेमुळे निर्माण झालेल्या वातावरणाच्या तुलनेत ते स्थगित झाल्याची माहिती अनेक नागरिकांपर्यंत पोहोचली नाही. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी बहुतांश प्रवाशांनी लवकर घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तसेच सुरू असलेल्या रिक्षा सेवांवर आंदोलनाचा परिणाम होऊ नये म्हणून अनेकांनी पालिकेच्या परिवहन सेवेचा पर्याय निवडला.

ज्यांना आंदोलन स्थगित झाल्याची माहिती होती ते प्रवासी शांत होते; मात्र ज्यांना याबाबत माहिती नव्हती, अशा प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र दिसून आले.