भाईंदर : राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी शंभर दिवसांची मुदतवाढ देत संभाषण प्रशिक्षणासाठी शासनाने पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. मात्र मराठी सक्तीच्या मुद्द्यावर मनसेने माघार घेतलेली नसल्यामुळे महाराष्ट्र दिनी रिक्षा चालक धास्तावले असल्याचे दिसून आले.

राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला आहे. या निर्णयाची १ मेपासून अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तसेच मराठी न बोलणाऱ्यांचे परवाने रद्द करण्याची भूमिकाही त्यांनी घेतली होती.मात्र या निर्णयामुळे अनेक परप्रांतीय रिक्षा-टॅक्सी चालकांना त्रास होणार असल्याने वाहन चालक संघटनांकडून याला विरोध करण्यात आला. तसेच या संदर्भात शासनाने मुदतवाढ द्यावी, अशी मागणी विविध पक्षांच्या नेत्यांकडून संघटनांमार्फत करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर २८ एप्रिल रोजी परिवहन मंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत आणखी शंभर दिवसांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच चालकांसाठी मराठीतील प्रचलित वाक्यांची पुस्तिका शासनाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

दरम्यान, शासनाकडून सवलत मिळाली असली तरी या विषयावर मनसेने आक्रमक भूमिका कायम ठेवली आहे. मराठी बोलण्यास नकार देणाऱ्या किंवा मुजोर वर्तन करणाऱ्या चालकांना धडा शिकवण्याचा इशारा पक्षाच्या पदाधिकाऱ्यांकडून वारंवार देण्यात येत आहे. यासाठी रिक्षांवर ‘चालक मराठी बोलतो’ असे स्टिकर लावले जात आहेत.त्यामुळे महाराष्ट्र दिनी पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक भूमिका घेतात का, अशी भीती मिरा-भाईंदरसह आसपासच्या रिक्षा चालकांमध्ये निर्माण झाली आहे. काही चालकांनी सावधगिरीचा उपाय म्हणून गाड्या रस्त्यावर न काढण्याचा निर्णय घेतला. मराठीचा सन्मान हीच आमची मागणी असून त्या दृष्टीने आम्ही काम करत असल्याची माहिती मनसे पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.