वसई: मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या वतीने सेवा संकल्प अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र या रोजगार मेळाव्याचे मंगळवारी आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात १९ हून अधिक नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. तर रोजगार इच्छुक तरुण – तरुणींनीदेखील या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
रोजगार इच्छुक युवक-युवतींना विविध क्षेत्रांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशा मंगळवार, २९ सप्टेंबर रोजी मिरारोड पूर्वेतील धम्मसम्राट अशोक बुद्धविहार व विपश्यना केंद्र येथे सेवा संकल्प अभियान अंतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय ‘रोजगार महाकुंभ – महाराष्ट्र’ या रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. रोजगार मेळाव्याचे उद्घाटन आयुक्त राधाबिनोद अ. शर्मा यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आयुक्तांनी उपस्थित युवक-युवतींशी संवाद साधून रोजगाराच्या उपलब्ध संधींचा अधिकाधिक लाभ घेण्याचे आवाहन केले. युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे तसेच उद्योग, आस्थापना व नियोक्त्यांना आवश्यक कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, हा या रोजगार महाकुंभाचा प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.
रोजगार मेळाव्याच्या समारोपप्रसंगी महापौर डिंपल विनोद मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील उपस्थित होते. याप्रसंगी महापौर यांनी रोजगार मेळाव्यात सहभागी झालेल्या युवक-युवतींशी संवाद साधून उपलब्ध रोजगाराच्या संधींचा योग्य प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले. युवकांनी बदलत्या काळानुसार आवश्यक कौशल्ये आत्मसात करून विविध क्षेत्रांमध्ये उपलब्ध असलेल्या संधींचा उपयोग करावा तसेच रोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे मार्गदर्शन त्यांनी केले.
तसेच, उपमहापौर यांनीही उपस्थित युवक-युवतींना मार्गदर्शन केले. रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणाऱ्या कंपन्या व संस्थांशी थेट संवाद साधून आपल्या शैक्षणिक पात्रता व कौशल्यानुसार योग्य संधीची निवड करावी तसेच उपलब्ध संधींचा आत्मविश्वासाने लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. युवकांना रोजगाराच्या माध्यमातून स्वावलंबी व सक्षम बनविण्यासाठी अशा उपक्रमांना सातत्याने प्रोत्साहन देण्याची भूमिका त्यांनी व्यक्त केली.
या रोजगार मेळाव्यात विविध क्षेत्रांतील १९ नामांकित कंपन्या व संस्थांनी सहभाग नोंदविला. यामध्ये एचडीबी फायनान्शियल्स, कोटक बँक, मोतीलाल ओसवाल, झेप्टो, टेक महिंद्रा फाउंडेशन, टेलिपरफॉर्मन्स, वॉकहार्ट हॉस्पिटल यांसह विविध कंपन्यांचा समावेश होता. विविध पदांसाठी १ हजार ३९३ हून अधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या असून, सहभागी कंपन्यांच्या प्रतिनिधींमार्फत उमेदवारांच्या मुलाखती व निवड प्रक्रिया राबविण्यात आली.
रोजगार महाकुंभामध्ये सहभागी झालेल्या रोजगार इच्छुक युवक-युवतींचाही यावेळी प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मेळाव्यात सहभागी झालेल्या १९ कंपन्या व संस्थांच्या प्रतिनिधींचाही महानगरपालिकेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच युवकांच्या रोजगारक्षमतेला चालना देण्यासाठी तसेच शहरातील उपलब्ध मनुष्यबळाला योग्य रोजगाराच्या संधी मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने यापुढेही अशाप्रकारचे उपक्रम राबविण्यात येतील असे पालिकेकडून सांगण्यात आले.
नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्रांचे वितरण
यावेळी, मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या माध्यमिक विभागातील नवनियुक्त शिक्षकांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये भाषा विषय, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र तसेच क्रीडा विषयांच्या शिक्षकांचा समावेश होता. महापौर, उपमहापौर तसेच उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संबंधित शिक्षकांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.
आधीच्या उपक्रमालाही उस्फूर्त प्रतिसाद
मिरा भाईंदर महापालिकेच्या वतीने यापूर्वी आयोजित करण्यात आलेल्या रोजगार मेळाव्यांनाही युवकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. कोटक एज्युकेशन फाउंडेशनच्या माध्यमातून ९१ उमेदवारांपैकी ६३ उमेदवारांना रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या होत्या, तर टेक महिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून ५४ उमेदवारांची यशस्वी नियुक्ती करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर यंदाच्या रोजगार महाकुंभाच्या माध्यमातून अधिकाधिक युवक-युवतींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
