भाईंदर :- मिरा भाईंदर शहरातील शाळाच्या सुरक्षेची पडताळणी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. मात्र मागील पंधरा दिवसात दोन शाळांना आग लागल्यानंतर हा निर्णय घेतल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.मिरा रोड येथील एन.एल. डालमिया शाळा- महाविद्यालयाच्या इमारतीच्या समोरच्या भागाला बुधवारी पहाटे भीषण आग लागली होती. या आगीत शाळेचे सभागृह आणि संगणक कक्ष जळून खाक झाला. सुदैवाने आग लागली तेव्हा शाळा सुरू नसल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर शहरातील शाळांमधील अग्निसुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. भविष्यात अशी घटना घडल्यास मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती.

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून मिरा-भाईंदर महापालिका व खासगी मिळून शहरातील सुमारे साडेतीनशे शाळांचे फायर ऑडिट अग्निशमन विभागामार्फत करण्याचा निर्णय गुरुवारी घेण्यात आला.या तपासणीत अग्निसुरक्षा यंत्रणा, आपत्कालीन बाहेर पडण्याचे मार्ग, अग्निशामक उपकरणांची कार्यस्थिती आणि इतर सुरक्षा उपायांची पडताळणी केली जाणार आहे. त्रुटी आढळल्यास संबंधित शाळांना त्या दूर करण्याच्या सूचना दिल्या जातील. सुधारणा पूर्ण झाल्याचे राष्ट्रपती शाळेकडून कळविले गेल्यानंतरही भविष्यात अशा प्रकारची घटना घडल्यास संबंधित शाळा प्रशासनाची जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.

शिकवणी कडे मात्र दुर्लक्ष :

शहरातील अनेक खासगी शिकवणी वर्ग अरुंद व अपुऱ्या जागेत सुरू असून अनेक ठिकाणी पर्यायी बाहेर पडण्याचा मार्गही उपलब्ध नाही. त्यामुळे आग किंवा अन्य आपत्कालीन परिस्थितीत मोठी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही महिन्यांपूर्वी महापालिकेने अशा क्लासेसचे फायर ऑडिट केले होते. त्यात अनेक त्रुटी आढळूनही कारवाई झालेली नसल्याची बाब समोर आली असून, या प्रकरणी अग्निशमन विभागाच्या कार्यवाहीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.