भाईंदर :मिरा-भाईंदर शहरातील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वयंपुनर्विकासाला प्रोत्साहन देऊन विकासाचा पाया रचण्यात येणार आहे. सुरुवातीला शहरातील पाच इमारतींचा प्रायोगिक तत्त्वावर स्वयंपुनर्विकास करून दाखविण्याचा संकल्प करण्यात आला आहे, अशी माहिती स्वयं-पुनर्विकास मंडळाचे अध्यक्ष तथा आमदार प्रवीण दरेकर यांनी दिली.

मिरा-भाईंदर शहरात ३० वर्षांहून जुन्या इमारतींची संख्या मोठी आहे. त्यामुळे या इमारतींच्या पुनर्विकासाची गरज निर्माण झाली आहे. मात्र, विकासकांसोबतचे मतभेद, रखडणारी प्रक्रिया आणि अन्य कारणांमुळे अनेक मध्यमवर्गीय रहिवाशांना स्वतःच्या घरापासून अनेक वर्षे दूर राहावे लागते. पुनर्विकासाच्या प्रक्रियेत फसवणुकीच्या घटनाही घडत असल्याने नागरिकांसमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत.या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर स्वयंपुनर्विकासाची संकल्पना राबविण्यात येत आहे. या पद्धतीत पुनर्विकासाची जबाबदारी आणि नियंत्रण संबंधित गृहनिर्माण संस्थेकडे राहते. त्यामुळे विकासकाविना इमारतीचा पुनर्विकास करणे शक्य होते. तसेच रहिवाशांना सध्याच्या घराच्या क्षेत्रफळापेक्षा अधिक जागा मिळण्याचा लाभही मिळू शकतो.

संस्थांनी पुढाकार घेण्याचे आवाहन

आमदार नरेंद्र मेहता यांच्या वतीने मिरा रोड पूर्व येथील एस. के. स्टोन डोम येथे स्वयंपुनर्विकास मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला मिरा-भाईंदरमधील गृहनिर्माण संस्थांचे पदाधिकारी आणि सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. महापौर डिंपल मेहता आणि आमदार नरेंद्र मेहता यांचीही उपस्थिती होती.इमारतींची सुरक्षितता आणि नागरिकांच्या हक्काच्या घरासाठी स्वयंपुनर्विकास हा महत्त्वाचा पर्याय आहे. गृहनिर्माण संस्थांनी यासाठी पुढाकार घेतल्यास त्यांना आवश्यक ते सहकार्य करण्यात येणार आहे.शिबिरात स्वयंपुनर्विकासाची प्रक्रिया, आवश्यक शासकीय परवानग्या, मंजुरी, आर्थिक नियोजन, बँकांकडून मिळणारे अर्थसहाय्य आणि कायदेशीर बाबी याबाबत तज्ज्ञ तसेच संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. उपस्थित सोसायटी पदाधिकाऱ्यांच्या शंकांचे निरसनही करण्यात आले. त्यामुळे स्वयंपुनर्विकासाबाबत असलेला संभ्रम दूर करण्यासाठी शिबिर उपयुक्त ठरले.

मुंबईत २० हून अधिक प्रकल्प

स्वयंपुनर्विकासाचा उपक्रम सध्या मुंबई महानगर प्रदेशातील विविध भागांत राबविण्यात येत आहे. मुंबईत २० हून अधिक, ठाण्यात चार, वसई-विरारमध्ये एक तसेच अन्य शहरांमध्येही काही प्रकल्प या माध्यमातून सुरू आहेत. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदरमध्येही स्वयंपुनर्विकासाची योजना यशस्वी करण्यासाठी शासन स्तरावर आवश्यक ती मदत करण्यात येणार आहे.