भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालक व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याच्या निषेधार्थ शिवसेनेच्या वतीने गुरुवारी ‘खड्डे भरो’ आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये मुरूम व खडी टाकून प्रशासनाच्या भूमिकेचा निषेध केला.

मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गांसह ठाणे-घोडबंदर मार्गावरही मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, त्यामुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि वाहनांचे नुकसान होत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत आहेत. या पार्श्वभूमीवर रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.ठाणे-घोडबंदर मार्गावरील खड्डे भरण्यासाठी निधीची कमतरता असल्याचे कारण देत महापौर डिंपल मेहता यांनी प्रशासनाला नकार दिल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे.

त्यामुळे येत्या दोन दिवसांत शहरातील खड्डे न भरल्यास होणाऱ्या अपघातांसाठी महापौर डिंपल मेहता आणि संबंधित प्रशासनाला जबाबदार धरून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजू भोईर यांनी यापूर्वीच दिले होते. दरम्यान, ठाणे-घोडबंदर मार्गावर खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असले, तरी मिरा-भाईंदर शहरातील मुख्य मार्गांवरील खड्ड्यांची स्थिती कायम आहे.

त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते गुरुवारी रस्त्यावर उतरले आणि ‘खड्डे भरो’ आंदोलन करत खड्ड्यांमध्ये मुरूम टाकला. निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांवर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.