भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील प्रस्तावित कत्तलखान्यासाठी राखीव असलेले आरक्षण अखेर रद्द करण्यात आले असून त्या जागेवर उद्यानाचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. राज्य शासनाने सुधारित विकास आराखड्यातील फेरबदलांच्या अधिसूचनेत हा बदल सुचविला आहे. त्यामुळे या निर्णयावरून पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक पातळीवर चर्चा रंगण्याची चिन्हे आहेत.
मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या विकास आराखड्यात भाईंदर पश्चिम येथील आरक्षण क्रमांक ३१ ही जागा कत्तलखान्यासाठी राखीव ठेवण्यात आली होती. मात्र शहरात कत्तलखाना उभारण्यास भाजपने सातत्याने विरोध केला होता. यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत ठरावही मंजूर करण्यात आला होता. तसेच भाईंदर पश्चिम परिसरातील स्थानिक नागरिकांनीही या आरक्षणाला विरोध दर्शविला होता. त्यामुळे या जागेचे संपादन आणि पुढील कार्यवाही रखडली होती.
दरम्यान, राज्य शासनाने सुधारित विकास आराखड्यातील १६४ फेरबदलांची अधिसूचना प्रसिद्ध केली असून त्यास मंजुरी देण्यासाठी शुक्रवारी महापालिकेची विशेष महासभा बोलाविण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार आरक्षण क्रमांक ३१ मधील कत्तलखान्याचे आरक्षण रद्द करून त्या जागेवर उद्यानाचे आरक्षण प्रस्तावित करण्यात आले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असल्याने या प्रस्तावाला महासभेत मंजुरी मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मात्र शहरात मोठ्या प्रमाणावर मांसाहार करणारे नागरिक वास्तव्यास असल्याने या निर्णयाला काही घटकांकडून विरोध होण्याची शक्यता आहे. विशेषतः बकरी ईदच्या काळात दरवर्षी कत्तलखान्याचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याने या निर्णयावरून आगामी काळात वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
