भाईंदर : मिरा भाईंदर भटक्या श्वानांना अन्न देण्यासाठी महापालिकेने शहरात उभारलेल्या ‘फीडिंग’ केंद्राच्या देखभाल व स्वच्छतेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यामुळे दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उभा राहत आहे.

भटक्या श्वानांना नियोजित ठिकाणी अन्न मिळावे, तसेच प्राणीप्रेमी आणि नागरिकांमधील वाद कमी व्हावा, यासाठी मिरा भाईंदर महापालिकेने काही महिन्यांपूर्वी शहरातील विविध भागांत ‘फीडिंग’ केंद्र सुरू केले होते. या ठिकाणी प्राणीप्रेमींकडून श्वानांना अन्न दिले जाते. मात्र अन्न दिल्यानंतर उरलेले खाद्यपदार्थ वेळेवर हटविले जात नसल्याने ते कुजून परिसर अस्वच्छ होत आहे.

विशेषतः चिकन, अंडी व इतर मांसाहारी खाद्यपदार्थ तासन्‌तास उघड्यावर पडून राहत असल्याने तीव्र दुर्गंधी पसरत आहे. त्यामुळे माशा, डास आणि उंदरांचा वावर वाढल्याची तक्रार नागरिक करत आहेत.तसेच यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा देखील गंभीर प्रश्न उभा राहत आहे.
प्रामुख्याने सदर केंद्र स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही प्रभाग निहाय स्वच्छता निरीक्षकांकडे सोपवण्यात आली आहे.मात्र याकडे स्वच्छता कर्मचारी दुर्लक्ष पणा करत असल्यामुळे ही समस्या उभी राहत आहे. दरम्यान ज्या केंद्राची स्वच्छता होत नाही, अशा केंद्राची तक्रार आल्यास सार्वजनिक आरोग्य विभागाला लेखी पत्र देऊन मागणी केली जाणार असल्याची माहिती पालिकेच्या पशु संवर्धन विभागाचे अधिकारी विक्रम निराटले यांनी दिली आहे.

मदतीसाठी संपर्क क्रमांक जारी

मिरा-भाईंदर शहरात भटक्या श्वानाने चावा घेतल्यास किंवा इतर कोणताही त्रास झाल्यास नागरिकांनी तात्काळ महापालिकेला माहिती द्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी ०२२-२८१९२८२८ हा मदत क्रमांक जारी करण्यात आला आहे