भाईंदर: मिरा भाईंदर शहरात निश्चित केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी मोकाट श्वानांना उघड्यावर खाद्य देणाऱ्यांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याच्या महापालिकेच्या निर्णयाची कायदेशीरता तपासण्याचे निर्देश जिल्हा पशुसंवर्धन विभागाने दिले आहेत.
मिरा भाईंदर महापालिकेने शहरात श्वानांना खाद्य देण्यासाठी काही ठिकाणे निश्चित केली आहेत. या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी खाद्य दिल्यास पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद करण्यात आली आहे. उघड्यावर खाद्य दिल्यामुळे अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होत असल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, या निर्णयाला प्राणीप्रेमींकडून विरोध करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रोशन पाठक यांनी जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडे तक्रार केली. त्यानंतर ४ सप्टेंबर रोजी पाठवलेल्या पत्रात महापालिकेने निश्चित केलेल्या ठिकाणांव्यतिरिक्त अन्य ठिकाणी श्वानांना खाद्य दिल्यास पाच हजार रुपयांचा दंड आकारण्याच्या आदेशाची कायदेशीर वैधता तपासण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी महापालिकेच्या विधी व न्याय विभागाकडून अभिप्राय घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.तसेच प्राणी जन्म नियंत्रण नियम, २०२३ आणि भारतीय प्राणी कल्याण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार या प्रकरणाचा विचार करून आवश्यक कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे.
केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सात दिवसांत जिल्हा पशुसंवर्धन विभागाला सादर करण्याचे निर्देश पत्रातून देण्यात आले आहेत.दरम्यान, श्वानांना खाद्य देण्यास बंदी नसून खाद्य देण्यासाठी निश्चित केलेल्या ठिकाणांची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे यापूर्वी महापालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले होते. त्यामुळे आता जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या पत्रामुळे पाच हजार रुपयांच्या दंडाच्या निर्णयाच्या कायदेशीरतेबाबत प्रशासनाला स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे.तर या संदर्भात विधी विभागाशी चर्चा केली जाणार असल्याची प्रतिक्रिया पशु संवर्धन विभागाकडून देण्यात आली आहे.
