भाईंदर : मिरा भाईंदर शहरात रस्त्यावर कचरा टाकण्यासह श्वान आणि कबुतरांना उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला आहे. याबाबत नागरिकांना सूचना देण्यासाठी शहरातील विविध ठिकाणी जाहीर फलक लावण्यात आले आहेत.

मिरा भाईंदर शहरात मोकाट श्वानांना उघड्यावर अन्न देणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधी निर्माण होत असल्याच्या तक्रारी आहेत. याला आळा घालण्यासाठी महापालिकेने निश्चित केलेल्या फीडिंग स्पॉटव्यतिरिक्त अन्य ठिकाणी श्वानांना अन्न देणाऱ्या नागरिकांवर पाच हजार रुपयांपर्यंत दंड आकारण्याचे धोरण सत्ताधारी भाजपने नुकतेच मंजूर केले आहे. या निर्णयाला प्राणीप्रेमींकडून तीव्र विरोध करण्यात आला असून प्रशासनाच्या भूमिकेविरोधात न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली आहे.दरम्यान, या निर्णयावरून वाद निर्माण झाल्यानंतर श्वानांना अन्न देण्यास मनाई नसून फीडिंग स्पॉटची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे सांगत सत्ताधारी भाजपकडून वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. आमदार नरेंद्र मेहता यांनीही याबाबत घोषणा केली होती.

मात्र, आता शहरात उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करणारे फलक महापालिकेने लावले आहेत. विशेष म्हणजे, या फलकांवर कबुतरांना उघड्यावर दाणे टाकणाऱ्यांवरही कारवाई करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. श्वानांचा थेट उल्लेख करण्यात आलेला नसला तरी फलकावर श्वानाचे छायाचित्र लावून नागरिकांना संदेश देण्यात आला आहे.महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून लावण्यात आलेल्या या फलकांवर उघड्यावर अन्न टाकणाऱ्यांना ५०० ते ५,००० रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येणार असल्याची सूचना करण्यात आली आहे. प्रशासनाच्या या निर्णयाचे काही नागरिकांनी स्वागत केले असले, तरी प्राणीप्रेमींमध्ये मात्र संतापाचे वातावरण आहे.