वसई: मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी सोमवारी पगारवाढ व इतर प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन पुकारले होते. मात्र, पालिका प्रशासनाची झालेल्या चर्चेनंतर कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या वेतनासंबंधी चर्चा करण्यासाठी कामगार आयुक्त ठाणे यांच्यासोबत बैठकीचे आयोजनही करण्यात आले आहे.

मिरा भाईंदर महापालिकेच्या परिवहन विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी सोमवार मध्यरात्रीपासून विविध प्रलंबित मागण्यांसाठी कामबंद आंदोलन पुकारले होते. राष्ट्रीय कामगार युनियनच्या नेतृत्वात पुकारण्यात आलेल्या या आंदोलनात जवळपास ६०० कर्मचारी सहभागी झाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून वेतनवाढीसाठी पालिका प्रशासनासोबत पत्रव्यवहार सुरू आहेत. तसेच सप्टेंबर महिन्यात यासंबंधी बैठकही पार पडली होती. मात्र, त्यानंतरही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत प्रभावी चर्चा न झाल्याने आंदोलन पुकारले असल्याची माहिती युनियनचे सचिव तुळशीदास इंगोले यांनी दिली.

तसेच २०१५ नंतर कर्मचाऱ्यांची पगारवाढ केलेली नाही. गेल्या ११ वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी तुटपुंज्या पगारात काम करत आहेत. तसेच शासनाचा २०२५ चा नवा शासननिर्णय हरकती व सूचनांच्या फेऱ्यात अडकल्यामुळे त्याचीही अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. त्यामुळे पालिकेने किमान दिल्या जाणाऱ्या प्रवासी भत्त्यात तरी वाढ करावी अशी मागणी यावेळी कर्मचाऱ्यांनी केली.

तर आंदोलनाची माहिती मिळताच पालिका प्रशासनाच्या वतीने अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे व अधिकाऱ्यांनी कर्मचारी संघटनेच्या प्रतिनिधींशी तातडीने चर्चा केली. पालिकेकडे कर्मचाऱ्यांचे कोणतेही वेतन किंवा भत्ते प्रलंबित नसून नियमानुसार दर सहा महिन्यांनी वाढीव विशेष भत्ता व सुट्टीचे वेतन नियमित दिले जात असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात वाढ करण्याचा निर्णय पालिका स्तरावर नसून तो शासनस्तरावरील निर्णय असल्याने, यासाठी कर्मचाऱ्यांचे निवेदन राज्य शासनाकडे पाठवून पाठपुरावा केला जाईल.

तसेच मुख्यमंत्र्यांनाही याबाबत निवेदन देऊन हा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन परिवहन समिती सभापती राजकुमार मिश्रा यांनी दिले. पालिका प्रशासनाशी झालेल्या चर्चेनंतर तब्बल १६ तासांनी परिवहन कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. तसेच कामगार आयुक्त ठाणे यांच्याबरोबर बुधवारी बैठक घेण्यात येणार आहे. या बैठकीत कंत्राटी कर्मचाऱ्यांचा थकीत प्रवासी भत्ता, वैद्यकीय भत्ता याबाबत चर्चा केली जाणार आहे.