भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात अलीकडील मुसळधार पावसामुळे झाडे कोसळण्याच्या घटना वाढल्यानंतर महापालिकेने झाडांची छाटणी मोहीम सुरू केली आहे. मात्र, या मोहिमेत अनेक ठिकाणी आवश्यकतेपेक्षा अधिक छाटणी करून मोठ्या फांद्यांसह बुंध्यालगतचे भागही कापले जात असल्याचा आरोप केले जात आहे.

गेल्या चार दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरात ५० हून अधिक झाडे कोसळल्याची नोंद झाली आहे. तसेच एका तरुणाचा झाड अंगावर कोसळल्याने मृत्यू झाला. पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या उद्यान विभागाने शहरातील झाडांची तपासणी सुरू केली असून अतिरिक्त फांद्या व पानांची छाटणी केली जात आहे.

मात्र, अनेक ठिकाणी झाडांच्या मोठ्या फांद्यांसह मुख्य भागही कापले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अनेक झाडांचे नैसर्गिक स्वरूप बिघडले असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचा दावा पर्यावरणप्रेमींनी केला आहे. महाराष्ट्र वृक्ष संरक्षण अधिनियम, १९७५ नुसार १५.७ सेंटीमीटर (६ इंच) पेक्षा अधिक घेर असलेल्या झाडाच्या फांदीची छाटणी करण्यासाठी वृक्ष प्राधिकरणाची लेखी परवानगी आवश्यक आहे. मात्र, अनेक ठिकाणी या नियमांचे उल्लंघन करून मोठ्या फांद्या कापल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कृती झाडाचे नुकसान करणारी असून अधिनियमातील तरतुदीनुसार दंडनीय असल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते रोहित सुवर्णा यांनी महापालिकेकडे केली आहे.

कारणे दाखवा नोटीस

मिरा-भाईंदर शहरातील वृक्षछाटणीच्या कामासाठी महापालिकेने कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे. या कंत्राटदाराला छाटणीनंतर गोळा होणाऱ्या पाचोळा व फांद्यांच्या वजनाच्या आधारे मोबदला दिला जातो. मात्र, छाटणीचे काम नियमानुसार होत नसल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार संबंधित अधिकाऱ्यांना याबाबत खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, अशी माहिती उपायुक्त सचिन बांगर यांनी तक्रारदारांना दिली आहे.