भाईंदर:-भाईंदरच्या गोडदेव गावातील जुन्या तलावात उभारण्यात आलेल्या ५१ फूट उंच विठ्ठल मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले आहे. सार्वजनिक ठिकाणी उभारण्यात आलेली काशीमिरानंतरची ही दुसरी भव्य मूर्ती आहे.

मिरा भाईंदर शहरात जवळपास १७ तलाव आहेत. या तलावांभोवती महापालिकेने उद्याने उभारली आहेत. या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्यासाठी खेळणी, व्यायामासाठी विविध प्रकारचे व्यायामाची साधने, बसण्यासाठी बाक, तसेच उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्यांना फिरण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. याशिवाय तलावाच्या सुशोभीकरणावर देखील महापालिकेकडून खर्च केला जात आहे.

दरम्यान गोडदेव येथील जुने तलाव व जरीमरी तलावात विठ्ठलाची उंच मूर्ती बसवण्याची मागणी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली होती. त्यावरून यासाठी आवश्यक असलेला निधी देखील शासनाने विशेष निधीच्या तरतुदीखाली मंजूर केला आहे. त्यानुसार आता ५१ फूट उंच विठ्ठलाची उभी मूर्ती उभारण्याचे काम सुरु आहे. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी काशिमीरा येथील मूर्तीचे प्रसिद्ध कीर्तनकार इंदूरीकर महाराज यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले होते.तर आता दुसऱ्या मूर्तीचे देखील रविवारी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि गावाकऱ्यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले आहे.

आकर्षक आतिषबाजी

भाईंदरच्या गोडदेव गावात जुने विठ्ठल मंदिर आहे. याच मंदिरा शेजारी असलेल्या तलावात ही उंच मूर्ती उभारण्यात आली आहे.त्यामुळे रविवारी या मूर्तीच्या लोकार्पण प्रसंगी मोठ्या संख्येने गावकर उपस्थितीत होते.यावेळी कीर्तन अभंग आणि प्रवचनाच्या कार्यक्रमामुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.तसेच लोकार्पण प्रसंगी मोठ्या प्रमाणात करण्यात आलेल्या आतिष बाजी मुळे सर्वत्र आनंद पसरला.

पर्यावरण प्रेमी नाराज

गोडदेव तलाव परिसरात विठ्ठल मूर्तीची उभारणी करण्यासाठी महापालिकेकडून जुन्या ५ झाडांना कापण्याची परवानगी देण्यात आली होती. याबाबत जाहीर सूचना प्रसिद्ध करण्यात आल्यानंतर पर्यावरण प्रेमींनी यावर आक्षेप नोंदवून समाज माध्यमांवर नाराजी व्यक्त केली आहे.