भाईंदर : भाईंदर पश्चिम येथील अप्पर तहसीलदार कार्यालयाला मंगळवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. महापालिका मुख्यालयाला आग लागल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शासकीय कार्यालयात आगीची घटना घडल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.
भाईंदर पश्चिम येथील मॅक्सेस मॉलच्या मागील बाजूस अप्पर तहसीलदार कार्यालय आहे. मंगळवारी रात्री सुमारे दहाच्या सुमारास कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली. रात्रीच्या वेळी कार्यालयात कर्मचारी उपस्थित नसल्याने सुरक्षारक्षक आणि रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी तत्काळ पोलिस आणि अग्निशमन दलाला माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले.
आगीची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली असली तरी परिसरात धुराचे प्रमाण वाढत असल्याने बचावकार्य सुरू ठेवण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. त्याचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.
दरम्यान, याच्या एक दिवस आधीच भाईंदर पश्चिम येथील मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागली होती. या घटनेनंतर आयुक्त राधाबिनोद शर्मा यांनी शहरातील शासकीय कार्यालयांचे अग्निसुरक्षा परीक्षण (फायर ऑडिट) करण्याचे आदेश दिले होते. या आदेशानुसार प्रशासनाकडून कार्यवाही सुरू असतानाच दुसऱ्याच दिवशी अप्पर तहसीलदार कार्यालयात आग लागल्याने शासकीय कार्यालयांमधील अग्निसुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
