भाईंदर :- उत्तन येथे असलेल्या मिरा भाईंदर महापालिकेच्या घनकचरा प्रकल्पाला आग लागू नये म्हणून महापालिकेने मागील काही वर्षांत लाखो रुपये खर्च करून विविध उपाययोजना केल्या आहेत. मात्र तरीदेखील येथे आग लागण्याचे सत्र सुरूच असून नागरिक हैराण झाले आहेत. भाईंदर पश्चिम येथील उत्तन परिसरात मिरा भाईंदर महापालिकेची कचरा भूमी आहे. या कचरा भूमीवर शहरात गोळा होणारा कचरा आणून टाकला जातो.

वाढत्या नागरीकरणामुळे शहरातील कचऱ्याचे प्रमाणही वाढू लागले आहे. यामुळे सुमारे आठ लाख मेट्रिक टन इतका कचऱ्याचा डोंगर तयार झाला आहे. साचलेला कचरा पडून असल्याने भर उन्हात त्याला आग लागण्याच्या घटना घडतात. उन्हाळ्यात याचे प्रमाण सर्वाधिक असते. यामुळे आजूबाजूच्या परिसरात प्रदूषण पसरते.

या आगीवर पालिकेच्या अग्निशमन विभागाकडून वेळेत नियंत्रण मिळवले जात असले तरी याचा प्रचंड त्रास स्थानिकांना होत आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या घनकचरा प्रकल्पावर लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी महापालिकेने आजवर अनेक उपक्रम राबवले आहेत. यामध्ये प्रकल्प स्थळी पाण्याची फवारणी करणे, पाण्याची गरज भागवण्यासाठी बोरवेल उभारणी, अग्निशमन गाड्या व कर्मचारी आदी उपायांचा समावेश आहे.

यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र तरीदेखील वारंवार आग लागून प्रचंड धूर होत असल्याचे दिसून येत असून प्रशासनाची यंत्रणा निकामी असल्याची संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिक देत आहेत.

बायोमायनिंग सुरू :-

उत्तन येथे साचलेल्या कचऱ्याला आग लागण्याच्या घटना घडत असल्यामुळे हा कचरा प्रक्रिया करून पूर्णतः नष्ट करण्याचे काम मागील वर्षभरात महापालिकेने प्रभावीपणे हाती घेतले आहे. यासाठी तीन कंत्राटदार नेमण्यात आले असून जवळपास पन्नास हजार मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यात आली आहे. या परिस्थितीचा आढावा स्वतः आयुक्त राधा बिनोद शर्मा वारंवार घेत आहेत. त्यामुळे आगामी काही वर्षांत ही समस्या कायमची मार्गी लागेल, असा दावा सार्वजनिक आरोग्य विभागाकडून करण्यात आला आहे.