भाईंदर :उत्तन परिसरात हातभट्टीच्या स्फोटात तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर ही दुर्घटना असल्याचा बनाव रचून मृतदेह जाळण्यात आला होता.या प्रकरणी गुन्हे शाखेने तिघांना अटक केली आहे. त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवध आणि पुरावा नष्ट केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उत्तन परिसरात सरकारी जागेवर बेकायदा हातभट्टी चालवली जात होती. या ठिकाणी सॅबस्टीन मेंडोसा, त्याचा भाऊ संदीप मेंडोसा आणि रितू चौधरी हे दारू तयार करण्याचे काम करत होते. त्यासाठी पाणी गरम केले जात असतानाच अचानक गॅस सिलेंडरचा स्फोट झाला होता. यात रितू चौधरी याचा होरपळून मृत्यू झाला, तर सॅबस्टीन आणि संदीप हे दोघेही भाजून जखमी झाले.हातभट्टीचा प्रकार उघडकीस येण्याच्या भीतीने दोघांनी रितूचा मृतदेह कामगारांच्या खोलीत नेला. तेथे डिझेल ओतून खोली पेटवून दिली. त्यानंतर जेवण बनवताना आग लागून सिलेंडरचा स्फोट झाल्याने कामगाराचा मृत्यू झाल्याची खोटी माहिती सॅबस्टीनची पत्नी कॅरोल मेंडोसा हिने पोलिसांना दिली. त्यामुळे सुरुवातीला उत्तन सागरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.

दरम्यान, घटनेनंतर सॅबस्टीन इगतपुरी येथे पळून गेला, तर संदीप मुंबईतील नायर रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला. बाथरूममध्ये अंगावर गरम पाणी सांडल्याने भाजल्याचे त्याने रुग्णालयात सांगितले होते.मात्र यात संशय निर्माण झाल्याने गुन्हे शाखेने तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सॅबस्टीन याला इगतपुरी येथून ताब्यात घेतले.त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला.तसेच पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी त्याची पत्नी कॅरोल हिलाही अटक केली. याप्रकरणी उत्तन सागरी पोलिसांनी सदोष मनुष्यवध आणि पुरावा नष्ट केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.