भाईंदर :-भाईंदर पश्चिम येथील उत्तन भागात महापालिकेमार्फत होणारा पाणीपुरवठा कमी झाल्याने येथील मच्छिमारांसमोर पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण झाली आहे.
उत्तन परिसरात जवळपास तीस हजारांहून अधिक कुटुंबे राहतात. यापैकी अनेक कुटुंबे मासेमारी व्यवसायावर अवलंबून आहेत. मच्छिमारांच्या बैठ्या घरांसाठी प्रशासनाने जलवाहिनी टाकून पाणीपुरवठ्याची व्यवस्था केली आहे. ठरावीक वेळापत्रकानुसार हा पाणीपुरवठा केला जातो. मात्र, मागील काही महिन्यांपासून या पुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याचे समोर आले आहे.
परिणामी, येथील नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. या समस्येला कंटाळून मंगळवारी मच्छिमारांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. उत्तन परिसरासाठी नव्याने पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक निश्चित करून पुरेसा पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. या पार्श्वभूमीवर आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी पाणीपुरवठा विभागाला याबाबत तपासणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.
दूषित पाण्याची समस्या
उत्तन परिसरातील पाणीपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने त्यानंतर येणारे पाणी अनेकदा दूषित असते, अशी तक्रार नागरिकांनी केली आहे. असे पाणी पिण्यास अथवा इतर वापरासाठी अयोग्य ठरत असून आरोग्याच्या समस्या उद्भवण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे काही नागरिक खाजगी पाणी विक्रेत्यांकडून पाणी खरेदी करत आहेत. मात्र, त्यामुळे त्यांच्या खर्चात मोठी वाढ होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

