​वसई: महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून मिरा-भाईंदर, वसई-विरार पोलीस आयुक्तालयाने नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणणारी मोठी कामगिरी केली आहे. आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध पोलीस ठाण्यांनी गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला तब्बल ७ कोटी ८६ लाख ९९ हजार मुद्देमाल शुक्रवारी पोलीस आयुक्तांच्या हस्ते तक्रारदारांना सन्मानपूर्वक परत करण्यात आला. यावेळी चोरी झालेल्या वस्तू पुन्हा मिळाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

वसई विरार व मिरा भाईंदर शहरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरी, जबरी चोरी, मोबाईल चोरी, घरफोडी आणि सायबर फसवणुकीच्या घटना घडल्या होत्या. त्याबाबत पोलीस ठाण्यात गुन्हे ही दाखल करण्यात आले होते. त्या गुन्ह्यांचा छडा लावून पोलिसांनी चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला होता. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ज्यांचा मुद्देमाल चोरीला गेला होता त्यांना तो परत करण्यात आला आहे.

​पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाटप करण्यात आलेल्या ऐवजामध्ये वाहने, मोबाईल, सोने,चांदी, सायबर गुन्ह्यात फसवणूक झालेली रोख रक्कम असा एकूण ७ कोटी ८६ लाखांचा ९९ हजारांचा मुद्देमाल परत केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. हरवलेल्या व चोरीला गेलेल्या वस्तू व रोख रक्कम पुन्हा मिळवून दिल्याने तक्रारदारांनी पोलिसांचे आभार मानत समाधान व्यक्त केले आहे.

या कार्यक्रमाला पोलीस आयुक्त निकेत कौशिक अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय शिंदे, सर्व पोलीस उपआयुक्त तसेच परिमंडळातील सर्व सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.