भाईंदर : मिरा-भाईंदर शहरातील विशेष सखोल पुनरीक्षणाची (एसआयआर) आकडेवारी जाहीर झाली असून, १४५ आणि १४६ विधानसभा मतदारसंघांतील मोठ्या संख्येने मतदारांच्या नोंदींबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या मतदारांचा फायदा नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजपला झाल्याचा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे.निवडणुकीपूर्वी बोगस मतदारांबाबत महापालिका आयुक्तांना माहिती देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार राज्यात राबविण्यात आलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहिमेअंतर्गत महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या ३१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आल्या. मीरा-भाईंदर शहरातील १४५ मीरा-भाईंदर आणि १४६ ओवळा-माजिवडा या दोन्ही मतदारसंघांतील आकडेवारीत मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या नोंदींची पडताळणी आवश्यक असल्याचे दिसून येत आहे.या मतदारांचा थेट फायदा स्थानिक सत्ताधारी पक्षाने घेतला. महापालिका निवडणुकीच्या काळात आपण बोगस मतदारांबाबत आयुक्तांना सूचित केले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. परिणामी जनसंपर्क आमच्या बाजूने असतानाही निवडणुकीत कौल सत्ताधारी पक्षाच्या बाजूने गेला,असा दावा सरनाईक यांनी केला.भाजपने मतदारयादीच्या पातळीवर चांगले काम केल्यामुळे त्यांना विजय मिळाला, तर आपल्या कार्यकर्त्यांनी याकडे पुरेसे लक्ष न दिल्याने पराभव झाल्याचे सरनाईक म्हणाले. तसेच मागील गोष्टी मागे ठेवून आगामी निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे,असेही त्यांनी सांगितले.
महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्र असताना शिवसेनेच्या मंत्र्याकडून भाजपवर करण्यात आलेल्या या आरोपांमुळे स्थानिक राजकारणात वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. मतदारयादीच्या पातळीवर स्थानिक पातळीवर घोळ झाल्याचा आरोपही सरनाईक यांनी केला.
१४५ मध्ये ५६ तर १४६ मध्ये ५१ टक्के बोगस मतदार?
एसआयआरच्या आकडेवारीनुसार, १४५ मिरा-भाईंदर विधानसभा मतदारसंघात ५ लाख १४ हजार ९५० मतदारांपैकी ३ लाख १ हजार ९०५ नोंदी उपलब्ध असल्याचे, तर २ लाख १३ हजार ४५ नोंदींबाबत पडताळणीची आवश्यकता असल्याचे आकडेवारीतून दिसते. १४६ ओवळा-माजिवडा मतदारसंघात २ लाख ९२ हजार ५३७ मतदारांपैकी १ लाख ४८ हजार ४१८ नोंदी उपलब्ध असून, १ लाख ४२ हजार ६६१ नोंदींची पडताळणी आवश्यक असल्याचे दिसते. मृत, स्थलांतरित किंवा दुबार नोंदींचा यात समावेश असल्याचे सरनाईक यांनी म्हटले आहे.
