भाईंदर: मिरा भाईंदर शहरातील वारकरी बांधवांची अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली आहे. दोन कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘संत ज्ञानेश्वर वारकरी भवनाचे’ लोकार्पण शुक्रवारी मोठ्या उत्साहात करण्यात आले.

विठ्ठलाचे उपासक असणारे वारकरी हे हिंदू धर्माच्या आध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा समुदाय आहेत.मिरा भाईंदर शहरातही वारकरी समुदायाची लक्षणीय उपस्थिती आहे. त्यामुळे वारकरी बांधवांकडून शहरात वारकरी भवन उभारण्याची मागणी केली जात होती. याच मागणीला दुजोरा देत मिरारोड येथील काशीमीरा परिसरात वारकरी भवनाची उभारणी करण्यात आली आहे.

वारकरी भवनाच्या लोकार्पण सोहळ्याला ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांचे समाजप्रबोधनपर कीर्तन हे सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरले. स्थानिक वारकरी बांधव, शहरातील अनेक भजन मंडळे आणि कीर्तनप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या भक्तीमय वातावरणाचा अनुभव घेतला. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हे भव्य नाट्यगृह दुमदुमून गेले.

मिरा भाईंदर शहरात उभारण्यात आलेले वारकरी भवन दोन मजली असून, त्यासाठी एकूण २ कोटी रुपये इतका निधी खर्च करण्यात आला आहे. शहरातील वारकरी संप्रदायासाठी हे एक महत्त्वाचे आध्यात्मिक केंद्र म्हणून उदयास आले आहे.या भवनात भजन, कीर्तन, प्रवचन, तसेच वार्षिक धार्मिक कार्यक्रमांसाठी एक आधुनिक सभागृहउपलब्ध करून देण्यात आले आहे. तर संत साहित्य आणि वारकरी तत्त्वज्ञानाचा अभ्यास करण्यासाठी जागाही या भवनात उपलब्ध करून देण्यात आली आहे.

“संत ज्ञानेश्वर महाराजांच्या नावाने साकारलेले हे भवन भक्ती, सेवा आणि संस्कारांचे केंद्र बनेल. शहरातील वारकरी बांधवांची दशकांपासूनची मागणी पूर्ण केल्याचा मला अभिमान आहे. मीरा-भाईंदरच्या आध्यात्मिक विकासाचा नवा अध्याय या भवनाच्या माध्यमातून सुरू झाला असल्याची प्रतिक्रिया मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

तीन वर्षांपूर्वी झाले होते भूमिपूजन

नोव्हेंबर २०२२ साली ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख ऊर्फ इंदुरीकर महाराज यांच्या हस्ते वारकरी भवनाचे भूमिपूजन करण्यात आले होते. काशीमीरा येथे हा सोहळा पार पडला होता. वर्षभरात या वारकरी भवनाचे काम पूर्ण केले जाईल अशी ग्वाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिली होती. मात्र, आता सलग तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मिरा भाईंदर शहराला त्याचे पहिले वारकरी भवन मिळाले आहे.