भाईंदर :- मिरा भाईंदर शहरात रस्त्यांच्या कडेला ठेवण्यात आलेले अॅल्युमिनियमचे कचऱ्याचे डबे मोडकळीस आले आहेत. परिणामी प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.मिरा भाईंदर शहर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचे धोरण महापालिकेने निश्चित केले आहे. त्यानुसार शहरात नियमित स्वच्छता राखण्यासाठी स्वच्छता कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

याशिवाय नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकू नये, यासाठी शहरातील सार्वजनिक ठिकाणी कचऱ्याचे डबे बसवण्यात आले आहेत. यासाठी जवळपास पन्नास लाख रुपयांहून अधिक खर्च करण्यात आला आहे. मात्र प्रशासनाने बसवलेले हे डबे आता शहरातून गायब झाले असून अनेक डबे मोडकळीस आल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाचे मोठे नुकसान झाले आहे.

तसेच शहरात अनेक ठिकाणी कचऱ्याचे डबे दिसत नसल्याने नागरिक रस्त्यावर कचरा टाकत आहेत. परिणामी शहरातील अस्वच्छतेत भर पडत आहे.
प्रशासनाने हे डबे तातडीने पुन्हा बसवावेत, अशी मागणी नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. दरम्यान, शहरातील कचऱ्याच्या डब्यांचा आढावा घेतला जात असून त्यानुसार पुढील पावले उचलण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.