भाईंदर : पाणीसाठा मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्यामुळे एमआयडीसी कडून मिरा भाईंदर शहराला होणाऱ्या पाणी साठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कपातीचा हा निर्णय मागे घ्यावा यासाठी सत्ताधारी भाजप पक्षाने संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेत मागणी केली.मात्र संस्थेने ही मागणी फेटाळ्याने नागरिकांना येत्या दिवसात अजून पाणी टंचाईला सामोरे जावे लागणार आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून ८६ दशलक्ष लिटर आणि एमआयडीसीकडून १३५ दशलक्ष लिटर, असा एकूण २२१ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा मंजूर आहे. मात्र प्रत्यक्षात पाणीगळती आणि इतर कारणांमुळे शहराला सुमारे २०० दशलक्ष लिटर इतकाच पाणीपुरवठा होतो. शहराला दररोज २२५ दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पाण्याचे वितरण वेळापत्रक आखण्यात आले आहे. नियमित पुरवठा सुरू असताना नागरिकांना फारशी अडचण जाणवत नाही; मात्र पाणीपुरवठा खंडित झाल्यास टंचाईची समस्या तात्काळ जाणवते.दरम्यान, मागील काही दिवसांपासून शहराच्या पाणीपुरवठ्यात सातत्याने व्यत्यय येत असल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे.

आधीच असे चित्र असताना आता स्टेम व एमआयडीसीकडून गेल्या काही दिवसांपासून पाणी कपात लागू करण्यात आली आहे.पंधरा दिवसातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला जात आहे. पुढील काही दिवसांच्या पाण्याच्या नियोजनाच्या अनुषंगाने राज्य सरकारच्या आदेशानुसार ही कार्यवाही केली जात आहे. यामुळे उन्हामुळे पाण्याची मागणी वाढलेली असताना ३६ तासांनी केला जाणार पाणीपुरवठा ४२ तासांवर जावून पोहचला आहे. त्यामुळे शहरात तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यावरून विरोधी पक्षांनी ही आक्रमक भूमिका घेत, आंदोलने सुरू केली आहेत.

या पार्श्वभूमीवर महापौर डिंपल मेहता यांच्या अध्यक्षतेखाली उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील स्थायी समिती सभापती हसमुख गहलोत , पालिका आयुक्त राधाबिरोध शर्मा यांनी एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अभियंता पी. वेलारासु यांची भेट घेतली. तसेच मिरा-भाईंदर मधील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यासाठी पर्याय व्यवस्था नसल्याचे बाब लक्षात घेऊन कपात रद्द करण्याची मागणी त्यांनी केली. मात्र, त्यास एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांकडून नकार देण्यात आला असल्याचे कळते.पाऊस सुरू झाल्यानंतरच लागू करण्यात आलेली पाणी कपात रद्द करता, येईल असे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तसेच पाणी कपातीच्या निर्णयातून केवळ मिरा-भाईंदर ला पाणीपुरवठ्याची यंत्रणा लक्षात घेता , वगळता येणार नसल्याचे देखील सांगितले. त्यामुळे पावसाळा सुरू होत नाही ,तोपर्यंत नागरिकांना टंचाईला सामोरे जावे लागणार हे निश्चित झाले आहे.