भाईंदर :- दिवाळीच्या सणात मिरा भाईंदरकरांना पाणीकपातीपासून तात्पुरता दिलासा मिळणार आहे. सणासुदीच्या काळात नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी २ आणि ९ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेली पाणीपुरवठा बंदी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे दिवाळीत शहराचा पाणीपुरवठा नियमित राहणार आहे.
मिरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून (एमआयडीसी) दररोज जवळपास २०० दश लक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र, एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे पावसाचे प्रमाण घटले आहे. त्यामुळे धरणांमधील उपलब्ध पाणीसाठा ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत पुरविण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने १० टक्के पाणीकपात लागू केली आहे. त्यानुसार शहरात आठवड्यातून ठरावीक कालावधीसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे.
या निर्णयानुसार स्टेम प्राधिकरणाकडून दर बुधवारी १८ तास, तर एमआयडीसीकडून दर गुरुवार ते शनिवारदरम्यान ३६ तास पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. दिवाळीच्या काळात या कपातीमुळे गैरसोय होऊ नये, यासाठी २ आणि ९ नोव्हेंबर रोजी नियोजित असलेली पाणी बंदी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन दिवशी शहरातील पाणीपुरवठा नियमित राहणार आहे. मात्र, दिवाळीनंतर नियोजित पाणीकपात पुन्हा सुरू होणार असल्याने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करावा लागणार आहे.
महापालिकेची मागणी शासनाने फेटाळली
पाणी कपातीमुळे मिरा भाईंदर शहरात प्रचंड पाणीटंचाई समस्या उभी राहत आहे. यात नागरिक हैराण झाल्यामुळे हा रोज लोकप्रतिनिधींवर व्यक्त केला आहे. त्यामुळे सूर्या पाणी प्रकल्प योजनेच्या कामाला गती देण्यास स्टेम व एमआयडीसी कडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यातील कपात रद्द करण्याची मागणी महापौर डिंपल मेहता यांनी शासनाकडे केली आहे. मात्र पाणी कपातीचा निर्णय मागे घेण्यास शासनाने नकार दिला आहे.
