भाईंदर :– जलवाहिन्यांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मिरा भाईंदर शहराला होणारा पाणी पुरवठा शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवारी शहरात पाणी टंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.

मिरा भाईंदर शहराला स्टेम प्राधिकरण व महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्राधिकरणाकडून पाणी पुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पाणी पुरवठा योजनेच्या अंतर्गत देखभाल व दुरुस्तीची कामे करण्याकरीता गुरुवार २९ जानेवारी रात्री बारा वाजल्यापासून शुक्रवार ३० जानेवारी रात्री बारा वाजेपर्यंत असा एकूण २४ तास पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे.

परिणामी दैनंदिन वितरित होणारे पाणी शुक्रवारी बंद राहील. म्हणून शनिवारी मोठ्या गृहसंकुलांना पाणीटंचाईची समस्या जाणवणार आहे. तर स्टेम प्राधिकरणामार्फत होणारा पाणीपुरवठा सुरळीत राहणार आहे. तरी देखील नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता शरद नानेगावकर यांनी केले आहे.