भाईंदर : मिरा-भाईंदर शहरात तीव्र पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत असताना शहरातील प्रमुख राजकीय पक्ष मात्र एकमेकांविरोधात आंदोलन करण्यात व्यस्त असल्याचे चित्र आहे. पाणीटंचाईवर तोडगा काढण्यासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याऐवजी भाजप आणि शिवसेनेचे पदाधिकारी आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणात गुंतल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मिरा-भाईंदरला स्टेम आणि एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठ्यात १० टक्के कपात करण्यात आली आहे. याशिवाय या जलवाहिन्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीच्या कामांमुळे दोन दिवस पाणीपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांना आठवड्यातील प्रत्यक्ष पाच दिवसच पाणी मिळत आहे.

मिरा-भाईंदर शहराला सध्या दररोज सुमारे २०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत आहे. मात्र, शहराची प्रत्यक्ष गरज यापेक्षा अधिक आहे. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे नियोजन करून प्रशासनाकडून पुरवठा केला जात आहे. त्यातच शासनाने पाणी कपातीचा निर्णय घेतल्याने नागरिकांच्या अडचणींमध्ये आणखी भर पडली आहे. शहराची पाणीटंचाई दूर करण्यासाठी पालघर जिल्ह्यातील सूर्या प्रकल्पातून सुमारे २१८ दशलक्ष लिटर पाणी मंजूर करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाचे काम संथगतीने सुरू असल्याने शहराला अपेक्षित अतिरिक्त पाणी मिळण्यास विलंब होत आहे.

एकीकडे पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असताना दुसरीकडे भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये राजकीय संघर्ष सुरू आहे.भाजप आमदार नरेंद्र मेहता आणि परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यातील वादामुळे दोन्ही पक्षांचे पदाधिकारी एकमेकांविरोधात आक्रमक झाले आहेत. महापालिकेतील कथित भ्रष्टाचार, कामकाजातील अनियमितता आणि इतर मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.

महापालिकेच्या महासभेतील गोंधळानंतर पत्रकारांना मारहाण झाल्याच्या आरोपावरून शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून भाजप नगरसेवकांविरोधात विविध प्रभागांत आंदोलने केली जात आहेत. तर याला प्रत्युत्तर म्हणून परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत भाजपनेही आंदोलन पुकारले आहे. मात्र, शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या प्रश्नावर दोन्ही पक्षांकडून ठोस भूमिका किंवा आंदोलन होताना दिसत नाही. त्यामुळे नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांपेक्षा राजकीय संघर्षालाच प्राधान्य दिले जात असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.