भाईंदर :-मिरा भाईंदर शहरातील पाणीटंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत असल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आता नागरिक सरसावले आहेत. शहरातील डोंगराळ भागात पावसाचे पाणी अडवून लघुबंधारे उभारण्याची मागणी ऑल इंडिया सिटिझन्स व्हिजिलन्स कमिटी या संस्थेने केली आहे. यासंदर्भात महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे.

मिरा भाईंदर शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत असून त्या तुलनेत पाणीपुरवठा अपुरा पडत आहे. शहराला सध्या स्टेम आणि एमआयडीसीच्या माध्यमातून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची मागणी वाढत असून अनेक भागांत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यातच वारंवार होणारी पाणीकपात आणि जलवाहिन्यांच्या दुरुस्तीमुळे नागरिकांना तीन ते चार दिवस पाण्याची प्रतीक्षा करावी लागते. परिणामी नागरिकांना खासगी टँकरवर अवलंबून राहावे लागत असून त्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.

एकीकडे शहरात पाणीटंचाईची समस्या कायम असताना दुसरीकडे दरवर्षी पडणाऱ्या पावसाचे लाखो लिटर पाणी खाडी आणि समुद्रात वाहून जात आहे. हे पाणी साठवण्यासाठी महापालिकेकडून ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे शहरातील उत्तन-डोंगरी, घोडबंदर तसेच संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या डोंगराळ भागात लघुबंधारे उभारण्याचा पर्याय संस्थेने सुचवला आहे. या भागात नैसर्गिक पाणलोट क्षेत्र उपलब्ध असल्याने पावसाचे पाणी अडवून भूजल पातळी वाढवणे शक्य असल्याचे संस्थेचे म्हणणे आहे.

शेजारील वसई-विरार महापालिकेने १२० हून अधिक लघुबंधारे उभारले आहेत. त्याच धर्तीवर मिरा-भाईंदर शहरातही लघुबंधारे उभारण्यासाठी नियोजन करण्यात यावे. यासाठी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (नीरी) किंवा मुंबई आयआयटीमार्फत ६० दिवसांत सर्वेक्षण करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात यावा. तसेच अमृत २.० योजना, पंधरावा वित्त आयोग आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीतून पहिल्या टप्प्यात दहा लघुबंधारे उभारण्यात यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

याशिवाय शहरातील नवीन बांधकामांमध्ये पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था सक्तीची करावी. दरवर्षी समुद्रात वाहून जाणाऱ्या पाण्याचे प्रमाण आणि टँकरवर होणाऱ्या खर्चाचा अहवाल सार्वजनिक करावा. तसेच जलसंवर्धनासाठी स्वतंत्र कक्ष स्थापन करावा, अशा मागण्या संस्थेचे राष्ट्रीय मुख्य सरचिटणीस राजन वासू नायर यांनी निवेदनाद्वारे केल्या आहेत.